जत,संकेत टाइम्स : विविध प्रकारच्या कागदपत्रांसाठी तसेच अनुदान, मानधनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली येथील तहसिल कार्यालय परिसरातील दलालांकडून सर्वसामान्य नागरिकांची लुट केली जात आहे.तहसिल कार्यालय परिसरातील काही दलालांनी काही कर्मचाऱ्यांशी संधान साधून ‘दुकानदारी’ सुरू केल्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आहेत. विविध प्रकारची कामे करून देण्यासाठी दरही ठरले असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
काही कारणास्तव ज्या नागरिकांचे कामे तहसील कार्यालयात अडली आहे, अशा नागरिकांना गाठून काम करुन देण्याच्या नावाखाली सर्रास आर्थिक लुट केली जात आहे. साधारणत: नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी २ ते ५ हजार रुपये,प्रतिज्ञापत्र दोनशे ते तिनशे रुपये शुल्क, उत्पन्नाचा दाखला ५०० रुपये, सॉल्वन्शीसाठी एक हजार रुपये अशा विविध कामाकरीता दर ठरविण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. तहसिल कार्यालय परिसरातून दलाल हद्दपार करावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतूून होत आहे.
उमदेवारांना अधिकाऱ्यांचे अभय
जत तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या दुप्पट उमेदवार आहेत.अनेक विभागात थेट उमेदवारचं महत्वाची कागदपत्रे हातळत असतात.विशेष म्हणजे अशा बेकायदा उमेदवारांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय असल्याने त्याची दुकानदारी जोरात सुरू आहे. काही नव्याने आलेल्या दुय्यम अधिकाऱ्यांनी उमेदवाराकडून मिळकतीच्या रक्कमा ठरविल्याची चर्चा आहे.त्यामुळे नागरिकांना नागविण्याचे प्रकार वाढणार हे निश्चित झाले आहे.