जत : जत शहर आणि परिसरातील धाबे, हॉटेल व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापारी यांना दम देणाऱ्या फुकटचंबू फाळकूटदादांनी उच्छाद मांडला आहे. त्यांना पांढरपेशा गुंडांचा आधार मिळत आहे. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
शहरात मोठ्या गुन्ह्यांचा आलेख कमी होत चालला असला तरी, चौका-चौकात फाळकूटदादांची टोळकी वाढू लागली आहेत. हे फाळकूटदादा हॉटेल, ढाबा मालक आणि छोट्या व्यापाऱ्यांना दमदाटी करून पैशांची मागणी करत आहेत; तर काहीजण मोबाईल दुकानदारांना दम देऊन मोबाईल उचलून नेतात. तसेच पैसे न देता बॅलन्स मारुन घेतात. याला एखाद्याने नकार दिल्यास मग मारहाण केली जाते.
दमबाजी करून पेट्रोलपंपावरही पेट्रोल टाकून घेतले जात आहे., या सर्व प्रकाराबाबात पोलिसांत तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे या दादांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.वाहतुकीची समस्या नेहमीचीच डोकेदुखी आहे. मंगळवारी आणि गुपूवारी आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. याचा फायदा चोरटे उचलतात. बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरीचे प्रमाणही वाढतच चालले आहे.
बाजार पेठेत चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणे, पर्स मारणे आदी घटना घडू लागल्या आहेत. यामध्ये या फाळकूटदादांचाच वरदहस्त आहे. येथे नेमणुकीसाठी असलेले पोलीस मात्र नेहमीच इतरत्र भटकताना दिसतात.