तासगाव,संकेत टाइम्स ; सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या तासगाव कारखान्याची कोट्यवधी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून ही बिले मिळावीत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. मात्र कारखाना प्रशासन दाद देत नाही. आजही शेकडो शेतकऱ्यांची बिले थकीत आहेत. सोमवारपर्यंत ही बिले न मिळाल्यास कारखान्यासमोरच आत्महत्या करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
खासदार पाटील यांच्या तासगाव कारखान्याला अनेक शेतकऱ्यांनी ऊस पाठवला होता. ऊस पाठवून सुमारे अकरा महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी आजही शेकडो शेतकऱ्यांची बिले थकीत आहेत. ही बिले तातडीने मिळावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. या आंदोलनाच्या वणव्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बिलाचे धनादेश देण्यात आले. मात्र यातील अनेक धनादेश वटले नाहीत. नंतरच्या टप्प्यात पुन्हा काही धनादेश दिले. अनेक आंदोलनानंतर काही शेतकऱ्यांची बिले बँक खात्यावर जमा झाली.
मात्र आजही शेकडो शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत आहेत. जिल्ह्यातील इतर कारखान्यांचा दुसरा हंगाम सुरू झाला तरी अद्याप तासगाव कारखान्याच्या अनेक शेतकऱ्यांना ऊस बिले मिळाली नाहीत. या बिलासाठी शेतकऱ्यांनी कारखानास्थळावरून अनेक हेलपाटे मारले आहेत. मात्र कोणीही त्यांची दखल घेत नाही. केवळ तारीख पे तारीख देऊन बोळवण केली जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून ऊस बिले न मिळाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अनेकांच्या चुली पेटणेही अवघड झाले आहे. कर्जाचे हप्ते थकले आहेत. बळीराजा अक्षरशः रडकुंडीला आला आहे. मात्र खासदार संजय पाटील व कारखाना प्रशासनाला कणव येत नाही.
त्यामुळे शेतकरी आता शेवटच्या स्टेजला पोहोचले आहेत. कालच शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आज (शुक्रवार) पुन्हा अनेक गावातील शेतकरी कारखानास्थळावर जमले. यावेळी शेतकरी व कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांच्यात ऊस बिलावरून वादावादी झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
दरम्यान, आता जर सोमवारपर्यंत खात्यावर ऊस बिले जमा न झाल्यास कारखान्यासमोरच आत्महत्या करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, तासगावचे तहसीलदार, पोलीस स्टेशन, कारखाना प्रशासन यांना दिले आहे. निवेदनावर सुदाम माने, बाबा माने, गजानन पाटील, दत्तात्रय पाटील, महादेव पाटील, जगन्नाथ पाटील, सुनील चव्हाण, राणी शिंदे, बाबासाहेब वाघ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.