पुणे : कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील १२ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील २६४४ कोटी ७७ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. तर या शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा येत्या मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल ४ हजार ३ कोटी रुपयांची माफी मिळणार आहे.
दरम्यान वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग नाही व चालू वीजबिलांचा देखील भरणा नाही अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येत आहे. महावितरणवरील आर्थिक संकट अतिशय गंभीर असल्यामुळे शेतकऱ्यांनी किमान चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणातून कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील १२ लाख ५० हजार ६८५ शेतकऱ्यांकडे १० हजार ८४१ कोटी रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यातील २६४४ कोटी ७७ लाख रुपये महावितरणकडून निर्लेखनद्वारे सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूटद्वारे माफ करण्यात आले आहे. तसेच वीजबिलांच्या दुरुस्तीद्वारे १८९ कोटी ६८ लाख रुपये समायोजित करण्यात आले आहे. आता या शेतकऱ्यांकडे ८००७ कोटींची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च २०२२ पर्यंत त्यातील ५० टक्के म्हणजे ४ हजार ३ कोटी ५० लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित ४ हजार ३ कोटी ५० लाख रुपये देखील माफ करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत बारामती परिमंडलातील ७ लाख ३८ हजार २७७ शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील निर्लेखन, व्याज व दंड माफी व समायोजनेद्वारे २३१९ कोटी ४० लाख रुपये माफ करण्यात आले आहे. तर सुधारित थकबाकीमधील ५८३२ कोटी ७२ लाखांपैकी ५० टक्के रकमेचा येत्या मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास थकबाकीचे उर्वरित ५० टक्के म्हणजे २९१६ कोटी ३६ लाख रुपये माफ होणार आहेत. पुणे परिमंडलामधील १ लाख २५ हजार ७९९ शेतकऱ्यांचे १८० कोटी ७३ लाख रुपये माफ करण्यात आले असून ७४३ कोटी ७५ लाखांच्या सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास उर्वरित ३७१ कोटी ८७ लाख रुपये माफ होणार आहेत. कोल्हापूर परिमंडलामधील ३ लाख ८६ हजार ६०९ शेतकऱ्यांचे ३३४ कोटी ३३ लाख रुपये माफ करण्यात आले असून १४८८ कोटी १९ लाखांच्या सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास उर्वरित ७४४ कोटी ९ लाख रुपये माफ होणार आहेत.
आतापर्यंत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ५ लाख ५२ हजार २७६ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी ३५९ कोटी २७ लाखांचे चालू वीजबिल व ४०९ कोटी ९५ लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे. या सर्व शेतकऱ्यांचे धोरणानुसार व्याज व दंड माफी, निर्लेखनाची सूट तसेच वीजबिल दुरुस्ती समायोजन आणि ५० टक्के थकबाकी माफीचे एकूण १४५२ कोटी ७० लाख रुपये माफ करण्यात आले आहे. या योजनेमध्ये बारामती परिमंडलातील ३ लाख ७६ हजार ९०४, कोल्हापूर परिमंडलातील १ लाख ४२ हजार ६८९ आणि पुणे परिमंडलातील ३२ हजार ६८३ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
वीजग्राहकांकडे बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महावितरण सद्यस्थितीत अत्यंत कठीण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या चालू वीजबिलांची रक्कम भरणे आवश्यक झाले आहे. योजनेत सहभाग नाही तसेच चालू वीजबिलांचा भरणा देखील नाही अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे व सोबतच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
१ लाख ८० हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे
या योजनेचा लाभ घेत पश्चिम महाराष्ट्रातील १ लाख ८० हजार ५२२ शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांकडे ५६१ कोटी ९९ लाख रुपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी ९५ कोटी १२ लाख रुपये चालू वीजबिल व ५० टक्के थकबाकीचे २८१ कोटींचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. यात उर्वरित ५० टक्के थकबाकीचे २८१ कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. या योजनेतून बारामती परिमंडलातील ८३ हजार ५७६, कोल्हापूर परिमंडल- ८३ हजार १९२ आणि पुणे परिमंडलातील १३ हजार ७५४ शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.