जत : जत तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून खाकी वर्दीचा दरारा कमी कमी होत गेला असून सध्या तर तो दरारा काहीच दिसत नाही. यामुळे जत तालुक्यात पत्त्याचे क्लब, मटका, अवैध गुटखा, चंदन व्यवसाय, अवैध प्रवाशी वाहतूक, बनावट दारू, वाळू तस्करी, गांजाची तस्करी यासह गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली असून याकडे मात्र पोलीसांचे दुर्लक्ष होवू लागले आहे.
हे जर असेच सुरू राहिले तर जत तालुक्याचे बिहार व्हायला वेळ लागणार नाही. यामुळे पोलीस अधीक्षक यांनी वेळीच सावध होत जत तालुक्यांत सुरू असलेले अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात त्याची पाळेमुळे शोधून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.
जत तालुक्यातील सुरू असलेल्या अवैध धंद्यांमध्ये राजकीय नेत्यांचा शिरकाव झाल्यामुळे या धंद्यावर कोणी कारवाई करत नसल्याचेही बोलले जात आहे. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. भौगोलिक व विस्ताराने मोठा तालुका असल्याने दोन जत व उमदी असे पोलिस स्टेशन आहेत. जिल्ह्याचे शेवटचे टोक व सीमावर्ती सोलापूर जिल्हा व कर्नाटक हद्द असल्याने अवैद्य धंदेवाल्यांचे चांगलेच फावले आहे.
अवैध गुटखा व्यतिरिक्त इतरही धंदे या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात फोफावत असून हे धंदे नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत ? हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. जत तालुका तसा विकासापासून दूर असलेला जिल्हा जरी असला तरी या तालुक्यांत गेल्या दोन वर्षांपासून दोन नंबर धंद्यावाल्याचे धंदे जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. या अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तरीही याकडे मात्र संबंधीत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने हे धंदे मोठ्या जोमात सुरू आहेत.
जत तालुक्यात सुरू असलेले धंदे नेमके कोणाच्या आशीर्वादाने चालतात, या धंद्यावर पोलीस कारवाई का करत नाहीत, या धंद्यातील आरोपींवर गुन्हे दाखल होवूनही यांना तडीपार का करण्यात येत नाही. यासह इतर प्रश्न उपस्थित होत आहेत.