भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे. ही कीड देश पोखरत आहेच शिवाय देशाचे भविष्य असलेल्या गुणवंत तरुणांचे भविष्यही पोखरत आहे. महाराष्ट्रात अशी कोणती परीक्षा उरली नाही ज्यात भ्रष्टाचार, अनियमितता झाली नाही. वर्षभर अभ्यास करून सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो गरीब गुणवंत तरुणांचे स्वप्न धूसर करणारा घोटाळा उघडकीस येत आहे. आरोग्यखाते, एमपीएससी, एमआयडीसी पाठोपाठ म्हाडा परिक्षेचाही पेपर फुटला आहे.
पेपरफुटीची ही कीड शिक्षक भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षेलाही लागली आहे. पैसे घेऊन पेपर फोडणारी मोठी टोळी राज्यात अस्तित्वात आहे. ही टोळी राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहे. अर्थात प्रशासनातील काही भ्रष्ट उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय ही टोळी इतका मोठा घोटाळा करणे शक्य नाही. या घोटाळ्यात अनेक बडे अधिकारी गुंतले असण्याची शक्यता आहे
त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची, त्यामधील दोषींना अटक होण्याची करण्याची आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आणि भरती प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शी करण्याची गरज आहे. आजवरचा अनुभव पाहता या बाबी प्रत्यक्षात येण्याची शक्यता कमी दिसते पण तसे झाल्यास भ्रष्टाचाराची ही कीड संपूर्ण यंत्रणेलाच गिळंकृत करेल. त्यामुळे ही विषवल्ली वेळीच उखडून टाकायला हवी. सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी तयारी करणाऱ्या लाखो गुणवंत तरुणांचा आणि एकूणच समाजाचा विश्वास कायम राखायचा असेल तर कठोर पावले उचलायलाच हवीत. काही लाख रूपयांसाठी गुणवंत गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या टोळीचा छडा लावून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी.
तसेच ज्यांच्या आशीर्वादाशिवाय हा घोटाळा होऊ शकत नाही त्या झारीतील शुक्राचार्यांना तर त्यांच्यापेक्षाही कठोर शिक्षा व्हायला हवी अर्थात भ्रष्टाचाराची ही कीड आताची नसून पूर्वीपासूनच आहे. वास्तविक हे पूर्वीच व्हायला हवे होते परंतु ते न झाल्याने भ्रष्टाचाऱ्यांचा धीटपणा वाढत गेला. त्यातूनच मग पेपरफुटीचे प्रकरण सुरू झाले. पेपर फुटीचे ही प्रकरणे आता वेशीवर टांगली जाऊन भ्रष्टाचाऱ्यांना अटक केली जात आहे. पण गेली कित्येक वर्ष हे होतच होते आणि भ्रष्ट लोक सुखनैव कारभार करत होते आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आला आहे. त्याचे सतत नुकसान होत आले आहे. हे चोर पकडले जातील पण न पकडलेल्या चोरांचे आणि त्यामुळे हानी झालेल्या गुणवंत तरुण उमेदवारांच्या भविष्याचे काय ? हा प्रश्न उरतोच.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे