हिमालयातील पर्यावरणाला धोका

0
 देशातील 1.3 टक्के जंगले हिमालयाने व्यापलेली आहेत.  हिमालय हा घनदाट आणि अमर्याद जैवविविधतेचा प्रदेश आहे.  हे ठिकाण सुमारे 5.7 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेल्या हजारो प्राणी आणि वनस्पतींच्या  दुर्मिळ प्रजातींचे घर आहे.  हिमालय पर्वत, तेथील परिसंस्था, वन्यजीव, मौल्यवान वनस्पती ही आपल्या देशाची अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे.  केवळ हिमालयामुळेच आपल्या देशाचे पर्यावरण संतुलित आहे.  नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायड्रोलॉजी रुरकीच्या एका संशोधनात असे समोर आले आहे की हिमालयातील वातावरण झपाट्याने बदलत आहे.  आज हिमालयातील पर्यावरणाची स्थिती अत्यंत संवेदनशील  बनली आहे.

 

 

एनआय एच (NIH) च्या शास्त्रज्ञांच्या मते, हिमालयातील पाऊस आणि बर्फवृष्टीची वेळ गेल्या 20 वर्षांत बदलली आहे.  हिमालयातील हिमनद्या वितळल्यामुळे सरोवरे तयार होण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.मानवी हस्तक्षेप आणि प्रदूषणामुळे हिमालयाच्या पर्यावरणीय आरोग्यावर परिणाम झाला आहे.  विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड, जंगलातील अमूल्य नैसर्गिक संपत्तीचे सतत होणारे शोषण हिमालयीन पर्यावरणासाठी धोकादायक बनले आहे.

 

 

आज हिमालयीन प्रदेशातील संपूर्ण जैवविविधता धोक्यात आली आहे.  याची अनेक कारणे आहेत.  हिमालयातील जंगलांचे सततचे शोषण, तेथे वारंवार लागणाऱ्या अनियंत्रित आगी, तापमान वाढीमुळे हिमनद्या वितळणे, जैवविविधता मोठ्या प्रमाणात कमी होणे किंवा नष्ट होणे, अनेक मोठ्या नद्या कोरड्या पडणे अशी हिमालयीन पर्यावरणाच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.
याशिवाय खालावणारे भूजल स्त्रोत, विकासाच्या नावाखाली डोंगर निकामी करणे, त्यातच मानवाने पसरवलेला कचरा आणि प्रदूषण हे हिमालयातील पर्यावरणीय आरोग्यासाठी घातक आहेत.  निकृष्ट वनव्यवस्थापन आणि लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव हीदेखील हिमालयीन पर्यावरणाच्या धोक्याची कारणे आहेत.  विकासाच्या नावाखाली मोठमोठ्या इमारती बांधून रस्ते रुंदीकरण केले जात आहेत.

 

 

स्फोटकांच्या अंदाधुंद वापराने झालेल्या पडझडीमुळे पर्वत इतके कमकुवत झाले आहेत की थोडा पाऊस पडला की ते कोसळू लागले आहेत. भूस्खलन मोठ्या प्रमाणात होत आहे.उच्च हिमालयीन प्रदेशांमध्ये, पर्यावरण आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे 50 हून अधिक हिमनद्या आकुंचन पावत आहेत.  हिमनदी कमी झाल्याचा थेट परिणाम हिमालयातील वनस्पती, प्राणी आणि जंगले तसेच खालच्या हिमालयातील पिकांवर आणि हिमालयाच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर होत आहे.

 

 

अशा परिस्थितीत संपूर्ण देशच त्याच्या प्रभावापासून कसा अस्पर्शित राहील? त्यामुळे हिमनद्या लहान  होण्यापासून वाचवण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.  ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमालयातील जैवविविधता धोक्यात आली आहे.  हिमालयातील बदलते वातावरण आणि परिसंस्था हे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी हवा, पाणी आणि अन्नाच्या कमतरतेचे कारण असू शकते.

 

हवामानातीय बदल, हिमनदी वितळणे, पाऊस आणि बर्फवृष्टी यांच्या समय चक्रात होत असलेले बदल ,समुद्र पातळीत होत असलेल्या वाढीमुळे जगापुढे  आणखी एक नवे संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीला समोरे जाणं मानवासाठी खरेच मोठे आव्हान आहे. आपण एक गोष्ट विसरून गेलो आहोत की,  हिमालय सुरक्षित राहिला नाही तर आपण आणि आपली येणारी पिढी देखील सुरक्षित राहणार नाही.
त्यामुळे हिमालय सुरक्षित ठेवण्याची आणि सांभाळण्याची जबाबदारी आपल्‍या सर्वांची आहे.हिमालयातील नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता हिमालयीन पर्यावरणासाठी जितकी आवश्यक आहे,तितकीच  ती आपल्यासाठीही गरजेची आहे.हिमालय संवर्धन तेव्‍हाच शक्य होइल जेव्‍हा आपण सर्वानी हिमालयाचे महत्‍त्‍व आणि हिमालयाचे उपकार समजून घेतले पाहिजेत. स्थानिक लोकांबरोबरच देशातील आपली भावीपिढी ,खासकरून  सध्याची तरुणपिढी देखील हिमालयाच्या संरक्षणासाठी जागरूक राहिली पाहिजे. तसेच पुढे येऊन त्याच्या हितासाठी काम केले पाहिजे.

 

– मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

 

 

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.