कुख्यात पनामा पेपर लिक प्रकरणी केंद्रीय सक्त वसुली संचलनालयाने ( ईडी ) बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, माजी विश्वसुंदरी, बिग बी अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन हिची चौकशी केल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. अमिताभ बच्चन यांनी १९९३ साली बहामा आणि ब्रिटिश व्हर्जन आयलंड येथे स्थापन झालेल्या चार कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. ऐश्वर्या राय बच्चन या कंपनीची भागधारक आहेत.
या गुंतवणुकीतून जो लाभ बच्चन कुटुंबियांना मिळाला आहे त्याचा उल्लेख ऐश्वर्या रायने बच्चन तिच्या इन्कम टॅक्स मध्ये न केल्याने तिची चौकशी झाली आहे. लवकरच संपूर्ण बच्चन कुटुंबियांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या चौकशी नंतर केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर राजकीय पटलावर देखील खळबळ माजली आहे कारण ऐश्वर्या राय बच्चन यांच्या सासू जया बच्चन या समाजवादी पक्ष्याच्या खासदार असून समाजवादी पक्ष हा उत्तर प्रदेशमधील प्रमुख विरोधी पक्ष असून लवकरच तिथे विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे ही चौकशी राजकीय सुडापोटी केली जात आहे
असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
काय आहे पनामा पेपर लिक प्रकरण?
ज्या पनामा पेपरमुळे बच्चन कुटुंबीय चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे ते पनामा प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊया. अमेरिका खंडात पनामा हे छोटेसे गणराज्य आहे. तेथील मोझाक फोन्सको या कायदा सल्लागार कंपनीकडे जगभरातील कंपन्या व व्यक्ती यांच्या गुंतवणुकीची छुपी यादी होती.
आपल्या देशात कर चुकवण्यासाठी पैसा इतर देशात गुंतवून देशाचा कर चुकवणाऱ्यांची नावे या यादीत होती. ही यादी जर्मनीमधील एका वर्तमानपत्राने लिक केली. ही यादी लिक झाल्यावर जगभर खळबळ माजली. लिक झालेल्या या यादीत ४०० पेक्षा अधिक कंपन्या आणि ९०० पेक्षा अधिक व्यक्तींची नावे आहेत. यात जगभरातील राजकारणी, सिलिब्रेटी, उद्योगपती, व्यावसायिक यांची नावे आहेत. या यादीत पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांचेही नाव होते.
पनामा पेपरमध्ये नाव आल्याने नवाज शरीफ यांना खुर्ची सोडून पाकिस्तानमधून परागंदा व्हावे लागले होते. या यादीत जगभरातील सहा ते सात पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची नावे असल्याचे बोलले जाते त्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भावजींचेही नाव आहे. या यादीत भारतातील अनेक कंपन्या आणि व्यक्तींचीही नावे आहेत. ही यादी केंद्र सरकारला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ऐश्वर्या राय बच्चन हे त्यातील सर्वात मोठे नाव असल्याने त्याची चर्चा जास्त होत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही चौकशी झाल्याने चर्चा तर होणारच….
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे