बालगाव,संकेत टाइम्स : उमदी (ता.जत)ग्रामपंचायतीने अत्यंत पारदर्शक कारभार केला असून गावाच्या विकासासाठी शासनाचा निधी खर्च केला आहे.ग्रामपंचायतीने एक रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याचे सिद्ध करावे अन्यथा,त्याच्यावर अब्रू नुकसान भरपाईचा दावा दाखल करू, असा इशारा उमदी ग्रामपंचायतीचे कुटुंब प्रमुख व काँग्रेसचे नेते निवृत्ती शिंदे, उपसरपंच रमेश हळके यांनी पत्रकार बैठकीत दिला.
उमदी ग्रामपंचायतीवर आरोप करण्यात आले होते.त्या पार्श्वभूमीवर शिंदे व हळके यांनी पत्रकार परिषद घेतली.
निवृत्ती शिंदे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले की, उमदी ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर अत्यंत पारदर्शक कारभार करण्यात आला आहे. केवळ राजकीय द्वेषातून आरोप केले आहेत. ग्रामपंचायतीबद्दल एकाही व्यक्तीची तक्रार नाही. सामान्य माणसाची कामे केली जातात.ग्रामपंचायतीमध्ये एक रुपयाचा ही भ्रष्टाचार झालेला नाही. पाच कोटी रुपयांचा अपहार झाला हे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे.ग्रामपंचायतीला नेमका किती निधी येतो? किमान याची तरी त्यांनी माहिती घ्यावी मगच असे बिनबुडाचे आरोप करावेत.
ग्रामपंचायत सर्व निधी विकास कामावर खर्च करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल मारणे, टाकी बसवणे, पाईप लाईन टाकणे अशी अनेक कामे करण्यात आली आहेत. उपलब्ध निधीतून गटारी व रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. उमदी गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सध्याच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी केले आहे.