ढालगाव : हल्ली दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वाढल्यामुळे सामान्य माणसाचे देखील चालणे दुर्मिळ झाले आहे. गावाजवळच्या मळ्यातून देखील वैरणीचा बिंडा दुचाकीवर आणला जात असल्याचे चित्र आजच्या गावखेड्यात दिसत आहे. हा चालण्याचा व्यायाम दैनंदिन जीवनातील कमी होत असल्यामुळे मानवी आरोग्य कसे अडचणीत येते, याची उदाहरणे पाहायला मिळत आहेत.
अशा या जमान्यात आरेवाडी गावातील तरुणांनी आरेवाडी ते चिंचणी पायी जाण्याचा उपक्रम सुरू करत ‘भक्तिमार्गातून आरोग्य संपन्नेकडे’हा संदेश देत पदयात्रा काढली आहे. आरेवाडी आणि चिंचणी या नगरीचे नाते हे बहीण भावाचे नाते असून चिंचणीच्या मायाक्का यात्रेत मायवाला बंधू बिरोबाकडून आहेर माहेर करण्याचा मान आहे. या भक्ती मार्गाला पायी चालत जावून या तरुणांनी आरोग्य जपण्याचा संदेश दिला आहे.
३५ युवकांचा सहभाग असलेली ही पदयात्रा ढोल कैताळाच्या गजरात एक निशान घेवून काल मंगळवार दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी 4 वाजता चिंचणी कडे मार्गस्थ झाली. आरेवाडी – लंगरपेठ – धुळगाव – सलगरे करत लिंगनुर (ता. मिरज) गावात कालचा मुक्काम केला. त्यानंतर आज (१६ फेब्रुवारी) सकाळी पुढे पदयात्रा निघाली. पुढे मंगसुळीवरून उगार (कर्नाटक) येथे आज मुक्कामी पोहोचले आहेत. उद्या सकाळी पुढे जवळच असलेल्या कृष्णा नदीमध्ये पवित्र स्नान करून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही पदयात्रा आक्का मायवाच्या चिंचणीसोर नगरामध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर शुक्रवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी मानाचा नैवद्य आणि आहेर माहेर करून यात्रा पार पडल्यानंतर परतीला निघणार आहेत.
जवळपास १०० किमीचा हा पायी प्रवास म्हणजे आजच्या तरुणाईने चालले पाहिजे, हा संदेश देणारा आहे. किमान भक्ती यात्रेतून तरी चालण्याची सवय लागावी, त्याचे फायदे लक्षात यावेत आणि सामूहिक जीवनामध्ये कसे बसा उठावे आणि काय शिकावे याचे प्रत्यक्ष अनुभव अशा यात्रांमधून मिळून काही प्रमाणात व्यक्तिमत्त्व विकासाला मदत होते. म्हणून आरेवाडीच्या तरुणांचा ‘भक्तिमार्गातून आरोग्य संपन्नेकडे’ हा एक आगळावेगळा संदेश असल्याचे दिसत आहे.