सरसकट निर्बंधमुक्ती नको

0
कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. यावेळेला ती लवकर कमी झाली,याचा आनंद आणि समाधान सर्वांनाच आहे. केंद्राने निर्बंध हटवण्याची कार्यवाही करायला सांगितली आहे.अनेक राज्यांनी निर्बंध संपूर्णपणे हटवले आहेत. अद्याप महाराष्ट्र सरकारने कोणताच निर्णय घेतलेला नाही.साहजिकच सरकार काय निर्णय घेते,याकडे सर्वांचे विशेषतः व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे. संसर्ग आटोक्यात आला असला तरी कोरोना विषाणूतील उत्परीवर्तनाची प्रक्रिया ही पुढील काही काळ सातत्याने सुरू राहण्याची शक्यता आहे. वरवर पाहता अत्यंत सौम्य असलेला ओमायक्रोनचा संसर्ग लसीकरण न झालेल्या आणि जोखीम गटातील रुग्णांसाठी गंभीर रूप धारण करणारा ठरला, हे तिसऱ्या लाटेच्या काळात आपण पाहिले आहे. त्यामुळे सरसकट निर्बंध हटवणे जोखमीचे ठरणार आहे.

 

 

स्वयंशिस्त असेल तरच संपूर्ण निर्बंध हटवणे योग्य आहे.मात्र कोरोना महासाथीचा जोर ओसरला असला तरी त्याच्या संसर्गासह जगण्याची सवय करून घेणे याला आता पर्याय नाही.लसीकरण आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय अवलंबत आपले जगणे पूर्ववत करणे हाच उपाय सध्या दृष्टिपथात आहे. इतर काही राज्यात निर्बंध पूर्णपणे हटवले असले तरी महाराष्ट्राची परिस्थिती इतरांहून वेगळी आहे. महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची तीव्रता सातत्याने गंभीर राहिली आहे. त्यामुळे इतर राज्यातील निर्णय आणि महाराष्ट्रातील निर्णय याची तुलना करणेही योग्य नाही. राज्यात सरसकट निर्बंधांमुक्ती नको, असे जाणकारांना वाटते. मास्कची सक्ती रद्द न करता सर्व प्रतिबंधात्मक उपाय, वर्तन कायम ठेवण्याचा आग्रह धरून इतर निर्बंध मागे घेणे हा पर्याय असू शकेल. डेल्टा हा दुसरी लाट निर्माण करणारा करोनाचा गंभीर प्रकार अद्याप अस्तित्वात आहे. संपूर्ण निर्बंध उठवल्यास मास्क आणि इतर प्रतिबंधात्मक वर्तनाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी निर्बंध कमी करावेत पण संपूर्ण उठवू नयेत.

 

 

अमेरिका, युरोप येथे ओसरलेली लाट पुन्हा पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. त्यामुळे आपणही सावध राहताना साधारणतः जूनपर्यंत म्हणजे पँडेंमिक इंडेमीकमध्ये रूपांतरित होईपर्यंत आपण सावध राहणे योग्य ठरेल. विषाणूजन्य} आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांना स्वतःच्या चाचण्या करणे ,विलगिकरणात राहणे यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. कामकाजाची ठिकाणे, चित्रपटगृहे अशा बंद जागांच्या ठिकाणी शेकडो माणसे एकत्र येतात.अशा जागांमध्ये हवा खेळती राखणे, मास्क वापर आणि सुरक्षित अंतर याचा करणे महत्त्वाचे आहे. यामुळे संक्रमणाचा वेग आटोक्यात ठेवणे शक्य होणार आहे.

 

राज्यात विकास सोसायट्या ,बँका-पतसंस्था अशा सहकारी संस्था तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. गेले वर्ष दीड वर्ष या निवडणुका झाल्या नव्हत्या.शिवाय एप्रिल-मे लग्नाचा सिझन आहे. इतर समारंभ उरकले जात आहेत. साहजिकच संसर्गाचा धोका कायम आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा दर अद्याप दहा टक्क्यांपर्यंत आहे. सध्याची रुग्णसंख्या फसवी आहे. चाचण्या थांबल्या असल्यानेही रुग्णसंख्या कमी आली आहे.तिसरी लाट जीवावर बेतत नसल्याने रुग्ण उपचार घरीच करून घेत आहेत. घरगुती टेस्टिंग किट्स वापरून केल्या जाणाऱ्या चाचण्यांची संख्या लक्षणीय असल्याचे सांगितले जात आहे.मात्र ही संख्या सरकारी आकडेवारीत येत नाही.

 

सर्व निर्बंध हटवून जनजीवन पूर्वपदावर यायला हवे असेल तर मास्कचा वापर कायम ठेवणे आवश्यक आहे.विशेषतः बँका,विविध खासगी,सरकारी कार्यालये, अन्य बंदिस्त जागा,जिथे मोठ्या संख्येने माणसे एकत्र येतात,तेथे मास्कचा वापर कायम राहणे गरजेचे आहे.गर्दी टाळणे, अंतर राखणे,लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे या बाबी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.