जत : म्हैसाळ योजनेचे उन्हाळी आवर्तन आज पासुन सुरु झाल्याने जत तालुक्यातील अनेक गावांना याचा लाभ होणार आहे. ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक तलाव, पाणवठे कोरडे पडले होते. मात्र हे आवर्तन सुरु झाल्याने जत तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांना नवसंजीवनी मिळणार आहे.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे जत तालुक्यातील लाभक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या अगोदर ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ मध्ये कृष्णा नदीच्या पुराचे पाणी उचलून योजनेच्या लाभ क्षेत्रातील तालुक्यातील सर्व तलाव भरून देण्यात आले होते. त्याचा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला.
सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. अनेक तलाव व पाणवठे पाण्याअभावी कोरडे पडले होतेच तसेच सिंचनाचा प्रश्न आवासून उभा होता. म्हैसाळ योजनेचे उन्हाळी आवर्तन आज सुरु झाल्याने शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असून तालुक्यातील शेतमाल उत्पादनात ही यामुळे नक्कीच वाढ होईल,असा विश्वास आमदार विक्रमसिंह सांवत यांनी व्यक्त केला.पालकमंत्री जयंत पाटील यांचे आभार व्यक्त करणारा व्हिडिओ आ.सांवत यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.