२६ मार्च हा दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून संयुक्त राष्ट्र संघाच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क द्वारे दरवर्षी एक अहवाल प्रसिद्ध केला जातो. २०१२ पासून हा अहवाल प्रसिद्ध केला जातो. यावर्षी या अहवालाची दहावी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. या अहवालानुसार जगातील सर्वात आनंदी देश म्हणून फिनलँड देशाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे फिनलँड देशाने सलग पाचव्यांदा आनंदी देशांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड या देशांचा नंबर लागतो. भारत मात्र आनंदी देशांच्या यादीत खूप खालच्या स्थानी आहे. आनंदी देशांच्या यादीत भारत १३६ व्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी भारत १३९ व्या क्रमांकावर होता. विशेष म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ हे देश भारतापेक्षा अधिक आनंदी आहेत. नेपाळ ८४ व्या क्रमांकावर, बांगलादेश ९४ व्या, पाकिस्तान १२१ व्या तर श्रीलंका १२७ व्या स्थानी आहे. भारतासारख्या खंडप्राय देशातील लोक आनंदाबाबतीत तळाच्या स्थानी असणे ही चिंतेचीच बाब आहे.
भारतातील नागरिक आनंदी का राहू शकत नाही याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. जागतिक आनंदी अहवाल दोन प्रमुख कल्पनांवर आधारीत आहे. मत सर्व्हेक्षणावर मोजले जाणारे आनंद किंवा जिवन मूल्यमापन आणि जीडीपी, आयुमर्यादा, स्वातंत्र्य यासह कल्याण निर्धारित करणारे प्रमुख घटक ओळखणे. आनंद अहवाल ० ते १० च्या स्केलवर व्हेरिअबल वेटेड एव्हरेज स्कोर वापरून अहवाल ठराविक कालावधीत आणि इतर देशांच्या तुलनेत ट्रॅक केला जातो. आनंदी देशांच्या यादीत फिनलँडने सलग पाचव्यांदाअव्वल स्थान पटकावले आहे याला कारणही तसेच आहे. येथे अनेक गोष्टी निर्विवादपणे चांगल्या आहेत.
सुंदर निसर्ग, विस्तीर्ण जंगले आणि तलावांचा देश, हा देश सर्वव्यापी सार्वजनिक सेवांसाठी देखील हा देश ओळखला जातो. आम्ही सुव्यवस्थित आहोत, देशाच्या बऱ्याच गोष्टी व्यवस्थित आहेत असा तेथील लोकांचा विश्वास आहे. अधिकारावरील व्यापक विश्वास आणि गुन्हेगारीचा निम्न स्तर आणि समानता असे मत तेथील लोकांनी व्यक्त केले आहे. आनंदाच्या अहवालातील एक महत्वाचे मोजमाप म्हणजे लोकांना किती सुरक्षित वाटते. फिनलँड देशात गुन्हेगारी अतिशय कमी आहे. गुन्हेगारी कमी असल्याने येथील लोकांना सुरक्षित आणि आनंदी वाटते. फिनलँडने काही वर्षांपूर्वी आपल्या शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल केला आहे. फिनलँड मधील शिक्षण प्रणाली ही जगातील सर्वोत्तम शिक्षण प्रणाली मानली जाते.
फिनलँड देशात बेरोजगारीचा दर अतिशय कमी आहे. शिवाय तेथील आरोग्य प्रणाली देखील सर्वोत्तम आहे. त्यामुळे तेथील लोक सर्वाधिक आनंदी आहेत. फिनलँड देशाला इतर देशांपेक्षा वेगळे बनवणारा आणखी एक घटक म्हणजे समानता. जी प्रत्येकासाठी संधी निर्माण करते. मग ती कोणत्याही सामाजिक – आर्थिक पार्श्वभूमीचे असले तरीही. फिनलँडमध्ये मध्यमवर्ग जास्त आहे आणि गरिबी खूप कमी आहे. भारतातही जर फिनलँड सारखी व्यवस्था निर्माण झाली तर भारतीय लोकही आनंदी राहतील. मात्र येथील व्यवस्था बदलण्याची इच्छाशक्ती कोणाकडे नाही म्हणूनच भारत आनंदी देशाच्या यादीत तळाच्या स्थानी आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५