कोल्हापूर : श्रीज्योतिबा यात्रेला अवघे काही दिवस उरले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात चैत्र यात्रा होत आहे. यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होता कामा नये, तसेच सेवा-सुविधांमध्ये हयगय करु नका, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.
येत्या 16 एप्रिल रोजी वाडी रत्नागिरी येथे श्रीज्योतिबा चैत्र यात्रा साजरी होत आहे. या यात्रेनिमित्त किमान ६ ते ७ लाखापर्यंत भाविक देवदर्शनास येतात. या यात्रेचे नियोजन व पूर्व तयारीबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली वाडी रत्नागिरी येथील एमटीडीसी रिसॉर्ट येथे गुरुवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पन्हाळाचे उपविभागीय अधिकारी अमित माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र साळोखे, तहसीलदार रमेश शेंडगे, कोडोली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, सरपंच राधा बुणे यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.