जत,संकेत टाइम्स : क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या १९५ व्या जंयतीनिमित्त जत तालुका माळी समाज संघटना व फुले अनुयायी यांच्याकडून समाजातील उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.
‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते.
अशा थोर क्रांतिकारी महात्यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त आज सोमवार ता.११ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी अखिल भारतीय माळी समाजाचे संस्थापक शंकरराव लिंगे आणि पुरोगामी विचारवंत विश्वगुरू बसवण्णा यांचे गाडे अभ्यासक दैनिक पुण्यनगरीचे सोलापूरचे उपसंपादक चन्नवीर भद्रेश्वरमठ हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.महात्मा फुले जयंती बरोबर विश्वगुरू बसवण्णा,सावित्रीबाई फुले,विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शाहू महाराज,राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमाचे पुजनही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
त्याचबरोबर तालुक्यात माळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
जत शहरालगतच्या महात्मा फुले नगर,अचकनहळ्ळी रोड,शासकीय गोदामाजवळ,गावडेवस्ती शाळेनजिक हा भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे, या कार्यक्रमास फुले प्रेमीनी उपस्थित रहावे,असे आवाहन महात्मा फुले जयंती उत्सव मंडळ,फुले प्रेमी मंडळ,जत तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.