उद्योग समूहांनी मूल्यांकनापेक्षा नीतीमूल्यांना अधिक महत्व द्यावे

0
16

मुंबई : व्यवसायात उतरलेल्या कॉर्पोरेट्स, उद्योग समूहांनी अधिक लाभाचे उद्दिष्ट जरूर ठेवावे, परंतु उद्योगाच्या दीर्घकालीन विकास – विस्तारासाठी कंपनीच्या सकल मूल्यांकनापेक्षा शाश्वत नितीमूल्यांना अधिक महत्व द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

          राज्यपालांच्या हस्ते 2021 वर्षाचा  ‘इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इअर’ हा पुरस्कार हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांना गुरुवारी (दि. 14) मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एक्स्चेंज फॉर मीडिया माध्यम समूहातर्फे ‘इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इअर’ हा पुरस्कार देण्यात आला.

          यावेळी एक्स्चेंज फॉर मीडियाचे संस्थापक व मुख्य संपादक अनुराग बत्रा, सहसंस्थापक नवल आहुजा, एमएक्स प्लेयरचे मुख्य अधिकारी निखिल गांधी, एबीपी न्यूजचे मुख्याधिकारी अविनाश पांडेय व उद्योग, माध्यम, जाहिरात व मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

          देशाच्या व्यवसाय वाणिज्य इतिहासात अनेक उद्योग समूह आले आणि गेले. परंतु ज्या समूहांनी शाश्वत नीतिमूल्ये जपली तेच उद्योग प्रदीर्घ काळ टिकून आहेत. उद्योग समूहांनी नीतीमूल्ये जपली तर त्यांना यश तर मिळेलच परंतु समाजात देखील ते सकारात्मक प्रभाव पाडू शकतील असे राज्यपालांनी सांगितले.

          हिंदुस्थान युनिलिव्हरच्या उत्पादनांनी विश्वासार्हता जपल्यामुळे त्यांची उत्पादने दशकानुदशके ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत असे राज्यपालांनी सांगितले. संजीव मेहता यांच्या काळात हिंदुस्थान लिव्हर संस्थेचे बाजारभांडवल 13 बिलियन डॉलर पासून  65 बिलियन डॉलर इतके झाल्याबद्दल त्यांनी मेहतांचे अभिनंदन केले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here