पोलीसांनी नागरिकांसोबत सौहार्दाचे वातावरण निर्माण करावे ; पालकमंत्री सतेज पाटील

0

अंमली पदार्थ विरोधी मोहीम गतीमान करण्याच्या सूचना

 

कोल्हापूर : पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच नागरिकांबरोबर सौहार्दाचे वातावरण निर्माण करावे, असे प्रतिपादन करुन व्यसनाधीनतेकडे आकर्षित होणाऱ्या तरुण पिढीकडे विशेष लक्ष द्यावे. यासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहीम गतीमान करण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.

पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलेली 111 वाहने पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली, याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 4 कोटी 65 लाख रुपयांची वाहने खरेदी करण्यात आली असून यामध्ये 47 चारचाकी व 64 दुचाकींचा समावेश आहे. पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत अनेक उपक्रम, योजना राबविण्यात येत असून यापुढेही पोलीस दलासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल. पोलीस दलानेही गुणात्मकदृष्ट्या काम करण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यास प्राधान्य द्यावे.

Rate Card

कोरोना महामारीच्या काळात पोलीस दलाने कौतुकास्पद काम केले असून गुन्हे उकल करण्यामध्येही उल्लेखनीय काम आहे. यापुढेही कोल्हापूर पोलीसांनी लोकाभिमुख होऊन काम करावे. पकडण्यात आलेला मुद्देमाल ठेवण्यासाठी केंद्रस्तरीय स्ट्रॉग रुम तयार करावी अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केल्या. पोलीस दलास उपलब्ध करुन देण्यात आलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे कोल्हापूर पोलीस दल अधिक सक्षम व गतीमान होऊन काम करेल, असा विश्वास पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रारंभी पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक करुन कोल्हापूर पोलीस विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.