माडग्याळ,संकेत टाइम्स : माडग्याळ मेंढीस जी.आय.मानांकन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पशूसंर्वधन विभागाकडून केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव पाठविल्याची माहिती आ.विक्रमसिंह सावंत यांना पत्राद्वारे पशूसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांच्याकडून देण्यात आली आहे. जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात माडग्याळ मेंढीचे संगोपन केले जात आहे.त्याला मागणीही मोठी आहे.
त्या पार्श्वभूमीवर माडग्याळ मेंढीस जी.आय.मानांकन मिळावे यासाठी आ.विक्रमसिंह सावंत यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांचेकडे पत्र व्यवहार करून व समक्ष भेटून कार्यवाही करणेबाबत वारंवार पाठपुरावा केला होता.अखेर त्यास यश आले असून माडग्याळ मेंढीला महाराष्ट्राची मूळ जात म्हणून मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.याबाबत मंत्री महोदयांनी २ वेळा दिल्ली येथे संबंधित केंद्रशासनाच्या पदुम विभागाचे सचिव ,आयुक्त तसेच इंडियन कौन्सिल ऑफ अँग्रीकल्चर रिसर्च (ICAR)च्या अंतर्गत असलेल्या NBAGR च्या अधिकाऱ्यांना भेटून माडग्याळ मेंढीस राष्ट्रीय मान्यता मिळणेबाबत चर्चा केली आहे.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय समितीच्या B.R.C च्या बैठकीमध्ये समितीने महाराष्ट्र राज्याने माडग्याळ मेंढीचे पुन:सर्व्हेक्षण करून सुधारित आकडेवारी सादर करणेबाबत कळविले आहे.त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी महामंडळाने सविस्तर सर्व्हेक्षण करून सुधारित आकडेवारीसह राष्ट्रीय निवड समितीस अहवाल सादर केला आहे.
याबाबत केंद्र शासनाच्या अखत्यारीतील अविकानगर येथील (Central sheep &Wool Reserch Institute (CSWRI)या मेंढीवर राष्ट्रीय संशोधन करणाऱ्या संस्थेस मंत्री महोदयांनी संस्थेचे संचालक तथा सदस्य राष्ट्रीय निवड समिती (मेंढीतज्ञ) डॉ.अरुण तोमर यांच्याशी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत माडग्याळी मेंढीला राष्ट्रीय मान्यता मिळणेबाबत सविस्तर चर्चा केली.त्यामध्ये त्यांनी पुढील BRC बैठकीत हा विषय घेेतला जाईल.
त्यात महाराष्ट्राच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासित केले आहे.त्यामुळे माडग्याळी मेंढीस राष्ट्रीय मार्केट ,लोकरीस आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊन जत तालुक्यातील शेतकऱ्यांना, माडग्याळी मेंढीपालक धनगर बांधवांना त्याचा लवकरच प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.