राजकीय चाणक्य करणार पदयात्रा    

0
प्रशांत किशोर हे राजकीय चाणक्य मानले जातात. आपल्या रणनीतीच्या जोरावर त्यांनी अनेक राजकीय पक्षांना आणि नेत्यांना सत्ता मिळवून दिली आहे. मागील वर्षी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सहज विजय मिळवेल आणि तृणमूल काँग्रेसला जेमतेम दोन अंकी जागा मिळतील असा कयास असताना प्रशांत किशोर यांच्या रणनीतीमुळेच  भाजपला पराभव पत्करावा लागला होता.  ममता बॅनर्जी या मुस्लिमांचे लांगुलचालन करतात, त्यांच्या कारकिर्दीत अनेक मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांच्यावरही शारदा चिटफंड घोटाळ्यात आरोप झाले त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे असेच सर्वजण म्हणत असताना ममता बॅनर्जी यांनी प्रशांत किशोर यांच्यावर निवडणुकीची रणनिती ठरवण्याची जबाबदारी सोपवली आणि त्यांनी आपल्या रणनीतीने ममता बॅनर्जी यांना विजय मिळवून दिला.

 

भाजप ज्या नेत्यांना भ्रष्ट म्हणत त्याच नेत्यांना प्रवेश देऊन पावन करत आहेत हे त्यांनी मतदारांवर बिंबवले. मतदारांना थेट मुख्यमंत्र्यांशी बोलता यावे यासाठी त्यांनी दिदींशी बोला हा हॉटलाईन कार्यक्रम सुरू केला. सरकार तुमच्या दारी या कार्यक्रमातून नेत्यांना थेट मतदारांपर्यंत पोहचवले. निवडणूक आयोग पक्षपाती असून भाजपला मदत करत आहे हे त्यांनी मतदारांना सप्रमाण पटवून दिले या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे भाजपचा दारुण पराभव. तामिळनाडूमध्ये विजय मिळवण्यासाठी द्रमुकच्या एम के स्टॅलिन यांनीही प्रशांत किशोर यांचीच मदत घेतली. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यात प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते त्याचे कारण २०१४ साली ज्यावेळी नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले तेंव्हा प्रशांत किशोर यांनीच त्या निवडणुकीची रणनीती ठरवली होती. प्रशांत किशोर हे २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणनीतीकार होते.  चाय पे चर्चा, मन की बात या संकल्पना प्रशांत किशोर यांच्याच आहेत. त्यानंतर २०१५ साली त्यांनी नितीश कुमार यांना बिहारमध्ये विजय मिळवून दिला.
२०१७ साली झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे रणनीतीकार म्हणून काम केले आणि तिथे कॉंग्रेसला विजय मिळवून दिला. त्याचवर्षी आंध्रप्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या तिथे त्यांनी वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी काम केले. या निवडणुकीत जगनमोहन यांनी १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या. प्रशांत किशोर यांना उत्तरप्रदेशमध्ये मात्र काँग्रेसला  विजय मिळवून देता आला नाही.  २०१७ साली झालेल्या या निवडणुकीत ते काँग्रेसचे रणनीतीकार होते पण त्यांनी आखून दिलेल्या रणनीतीप्रमाणे  उत्तरप्रदेशमधील काँग्रेसच्या नेत्यांनी काम केले नाही. पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आणले.
उत्तरप्रदेशमधील नेत्यांनी मनमानी केली म्हणून तिथे त्यांना दारुण पराभव स्वीकारला लागला पण ज्या पक्षाने आणि नेत्याने प्रशांत किशोर यांच्या रणनीतीप्रमाणे काम केले त्यांना विजय मिळाला म्हणूनच प्रशांत किशोर यांना भारतातीलच नाही तर जगातील सर्वश्रेष्ठ रणनीतीकार म्हणून ओळखले जाते. प्रशांत किशोर यांनी मध्यंतरी नितीश कुमार यांच्या  जनता दल युनायटेड या पक्षात  प्रवेश केला पण सीएए व एनआरसी च्या मुद्द्यावर त्यांचे आणि नितीशकुमार यांचे मतभेद झाल्यावर त्यांनी तो पक्ष सोडला. मागील काही दिवसांपासून ते काँग्रेसच्या जवळ गेल्याचे दिसत होते. सोनिया गांधींशी त्यांची अनेकदा चर्चा झाली त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र त्यांचे आणि राहुल गांधी यांचे सूत काही जुळले नाही त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास ठाम नकार दिला.
विविध राजकीय पक्षांसाठी काम केल्यावर आता प्रशांत किशोर आता काय करणार असा प्रश्न विचारला जात आहे त्याचे उत्तर म्हणजे ते कदाचित स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करतील असे आहे. त्यांनी तशी अधिकृत घोषणा केली नसली तरी त्यांचे पाऊल त्या दृष्टीनेच पडत आहे.  त्यासाठी ते विकास आणि परिवर्तनाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहे.  आपल्या  नव्या इनिंगची सुरवात ते बिहारमधून करणार आहेत. आगामी तीन ते चार महिन्यात ते  ३००० किमी ची पदयात्रा काढणार आहे.
या पदयात्रे दरम्यान ते बिहारमधील १७००० लोकांशी चर्चा करणार आहेत. या पदयात्रे दरम्यान ते लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांची ही पदयात्रा म्हणजे ते स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे असे मानले जाते. अरविंद केजरीवाल यांनी ज्याप्रमाणे राजकारणात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले त्याप्रमाणे प्रशांत किशोरही राजकारणात स्वतःचे अस्तित्व निर्माण करू इच्छित आहे अर्थात त्यात त्यांना कितपत यश मिळेल हे येणारा काळच ठरवेल.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.