विधवा प्रथेविरुद्ध सांगली जिल्ह्यातील पहिला ठराव बलगवडे ग्रामपंचायतीने केला मंजूर | असा ठराव करणारी सांगली जिल्ह्यातील पहिली तर राज्यातील चौथी ग्रामपंचायत

0
 तासगाव, संकेत टाइम्स : तासगांव तालुक्यातील बलगवडे ग्रामपंचायतने आजच्या मासिक सभेमध्ये विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर केला आहे अशी माहिती सरपंच सौ. जयश्री हरिराम पाटील यांनी दिली. असा ठराव करणारी बलगवडे ही सांगली जिल्ह्यातील पहिली तर राज्यातील चौथी ग्रामपंचायत ठरली आहे.
शुक्रवार दि. २० मे रोजीच्या सभेमध्ये ग्रामसेवक विजयकुमार पाटील यांनी १७ मे चा विधवा प्रथेविरुद्धचा शासन निर्णय वाचून दाखवला. यावर साधकबाधक चर्चा होऊन ग्रामपंचायत सदस्य सौ. मिनाताई प्रकाश पाटील यांनी ठराव मांडला, त्याला ग्रामपंचायत सदस्य सौ. सारिका सोमनाथ बुधावले यांनी अनुमोदन दिले आणि सर्वसहमतीने ठराव मंजूर करण्यात आला. याअगोदर असा सुधारणावादी ठराव कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव, अकोला जिल्ह्यातील ढोरखेड ग्रामपंचायतीने मंजूर केले आहेत.
समाजात आजही विधवा महिलांना सामाजिक धार्मिक कार्यक्रमांत मान दिला जात नाही. भारतीय राज्यघटनेच्या नुसार महिलांना सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार १७ मे रोजी महाराष्ट्र शासनाने एक आदेश काढून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेविरुद्ध ठराव करावेत असे आदेश दिले आहेत, त्यानुसार बलगवडे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार हा ठराव सर्व सहमतीने मंजूर केला आहे.
Rate Card
या ठरावामध्ये म्हटले आहे की, गावामध्ये व राज्यामध्ये तसेच देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे या करिता विधवा प्रथा बंद करणेत येत आहे. यासंदर्भात महिला सहभागातून गावामध्ये जनजागृती करणेत येईल.
सांगली जिल्ह्यातील पहिल्यांदा बलगवडे ग्रामपंचायतनीने हा ठराव मंजूर करावा यासाठी गावचे नेते अनिल पाटील यांनी पुढाकार घेतला. यावेळी उपसरपंच श्रीकांत मोहिते, माजी उपसरपंच उध्दव शिंदे, सदस्य धनाजी शिंदे, महादेव माळी,सुवर्णा शिवाजी शिंदे, सचिन रघुनाथ पाटील, माजी सरपंच सुर्यकांत थोरात, अजित जाधव उपस्थित होते.
हा सुधारणावादी, पुरोगामी ठराव मंजूर केलेबद्दल या गावचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सर्व सदस्यांचे पुस्तके व पुष्पगुच्छ अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.