मरोळी : मारोळी, चिक्कलगी, जंगलगी व शिरनांदगी या भागात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून वितरिका क्र 2 मधून कॅनॉल द्वारे पाणी सुरू झाले.
उर्वरीत लवंगी, सलगर बु ,सलगर खु, आसबेवाडी या गावांना ही येत्या दोन दिवसांत पाणी सोडण्याचे प्रयत्न सूरू आहेत.
वितरीका क्र.1 मधून रेवेवाडी, लोणार, महमदाबाद (हू) आणि हुन्नुर या भागातील बंधारे मागणी प्रमाणे म्हैसाळ च्या पाण्याने भरून देण्यात आले आहेत.
कायम दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या मंगळवेढा तालुक्यांतील दक्षिण भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कृष्णामाईचे पाणी बघून आनंद ओसंडून वाहत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भाग हा दुष्काळी भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चला जात होता. मात्र आत्ता या भागावरील दुष्काळाच कलंक पुसला जाणार आहे.मारोळी परिसरात म्हैसाळचे पाणी दाखल झालेेे आहे. पाणी आल्याने शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला आहे.
बऱ्याच वर्षापासून चर्चेत असलेला म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा वितरिका क्रमांक दोनच्या कालवा द्वारे आल्याने ऐन उन्हाळ्यात मारोळी, शिरनांदगी ,चिक्कलगी ,जंगलगी परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
मंगळवेढा तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेला ३५ गावच्या पाण्याचा प्रश्न. २००९ च्या विधानसभेच्या निवडणूकीपासून मतदारसंघात पाणीप्रश्नाला जोर आला. त्यानंतर तत्कालीन आ. भारत भालके यांनी या पाणीप्रश्नावर पाठपुरावा केला. राज्यात व देशात सत्तांतर होत असल्यामुळे आ. भारत भालके यांना अनेक अडचणी आल्या. या योजनेचे पाणी तालुक्याला मिळावे म्हणून आ.भालके यांनी विधानसभेत सातत्याने माजी आ.गणपतराव देशमुख यांच्या सोबतीने आवाज उठवत राहिले. त्यामुळे या योजनेला पंतप्रधान सिंचन योजनेतून जवळपास दोन हजार पेक्षा अधिक कोटीची तरतूद करण्यात आल्यामुळे या कामाला गती मिळाली. अनेक वेळा या पाणी प्रश्नावरून स्थानिक आमदार व शासन हे विरोधी असल्याने पाणी देण्याबाबत राजकीय श्रेय वाद झाल्याचे आरोप-प्रत्यारोप बघायला मिळाले. त्यानंतर कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगलीला पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अतिरिक्त पाणी वाहून वाया जाण्यापेक्षा हे पाणी दुष्काळ या भागाला देण्यासंदर्भात शासनाने प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर पाणी शिरनांदगी तलावात आले दरम्यान एका वेळी एका वितिरीकेचे काम पूर्ण झाल्यामुळे हे पाणी सध्या कालव्यात सोडण्यात आले वितरिका २च्या माध्यमातून मारोळी तलावात पाणी दाखल झाले आहे.त्यामुळे महमदाबाद ,मारोळी ,शिरनांदगी, चिक्कलगी ,जंगलगी,सलगर खुर्द सलगर बुद्रुक पौट बावची या गावातील नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे. या भागातील शेतीला योजनेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या तालुक्याला अखेर म्हैसाळ योजनेचे पाणी मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.