सांगली : सांगली शहरातील संजयनगरमधिल रेकॉर्डवरील गुंडाचा अज्ञात व्यक्तींनी खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तुकाराम सुभाष मोटे (वय 27) असं मृत झालेल्या गुंडाचं नाव आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा खून झाला आहे. किरकोळ वादातून तुकाराम याचा चाकूने भोसकून खून झाला असल्याची प्राथामिक माहिती आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी दोन संशयिताना ताब्यात घेतले आहे.
मृत तुकाराम मोटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. काही महिन्यापूर्वी परिसरातील पेट्रोलपंपावर उधार पेट्रोल दिले नाही म्हणून त्याने महिला कर्मचार्याचा विनयभंग करुन मारहाण केली होती. इतकंच नाही तर, महिला कर्मचाऱ्याच्या हातातील पैसेही त्याने हिसकाण्याचा प्रयत्न केला होता. या संपूर्ण प्रकार समोर येताच पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर तो जामीनावर बाहेर आला होता.
दरम्यान, संजयनगर परिसरातील तरुणांकडे बघण्यावरुन त्याचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यातून हाणामारी झाली. या हाणामारीत तुकारामला चाकूने भोसकण्यात आले. तीन ठिकाणी खोलवर वार झाल्यामुळे तुकाराम मृत झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोघांना ताब्यात घेतले आहे. तुकाराम याचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास संजयनगर पोलीस करत आहेत.