प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गोल्डन कार्ड 30 जूनपर्यंत प्रत्येक लाभार्थ्याला मिळण्यासाठी ‍नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

0
2

सांगली : सामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरोग्याच्या विविध योजना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सुमारे 1 हजार 209 आजारांचा समावेश आहे. यामध्ये 5 लाख रूपयापर्यंतचे उपचार मोफत केले जातात. या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गोल्डन कार्डचे वितरण तातडीने करण्यासाठी विशेष मोहिमांचे आयोजन करावे. यासाठी गावनिहाय याद्या तयार करून त्यांचे वाटप प्रत्येक गावात करावे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गोल्डन कार्ड 30 जून पर्यंत प्रत्येक लाभार्थ्याला मिळेल याबाबतचे ‍नियोजन आरोग्य विभागाने करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गोल्डन कार्ड वितरण आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, महानगरपालिकेचे उपायुक्त राहूल रोकडे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. रोहित खोलकुबे, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात सुमारे 5 लाख 67 हजार 770 लाभार्थी असून यांची यादी तयार आहे. यामधील 1 लाख 43 हजार 173 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गोल्डन कार्ड मिळाले आहे. उर्वरीत पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गोल्डन कार्ड मिळावे यासाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शहरी भागांतील आरोग्य केंद्रे या ठिकाणी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर संग्राम केंद्रात नाममात्र शुल्क आकारून ही सुविधा उपलब्ध करावी. कार्डसाठी शासनाने निर्धारीत केलेल्या दरापेक्षा अधिकचा दर घेवू नये. यासाठी नियंत्रण ठेवण्यात यावे. तसेच प्राधिकृत केलेल्या रूग्णालयांमध्ये असे कॅम्प आयोजित करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here