पुणे : ऐश्वर्य आणि वैराग्य हे तुकोबारायांचे गुण आहेत. जगद्गुरु संत तुकाराम यांना वडिलोपार्जित ऐश्वर्य मिळाले होते तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुकाराम महाराजांना नजराणा भेट म्हणून पाठवला होता. वडिलोपार्जित ऐश्वर्य आणि प्रत्यक्षात छत्रपतींनी पाठवलेला नजराना नाकारून तुकोबारायांनी वैराग्य पत्करले. तुकोबारायांनी सांगितलेल्या भक्तिमार्गावर गेल्या साडे तीनशे वर्षांपासून लाखोंचा वारकरी सांप्रदाय मार्गक्रमण करीत आहे हे तुकोबारायांचे ऐश्वर्यच आहे. त्यांचे भक्त भाविक आमदार अण्णा बनसोडे आणि पिंपरी चिंचवड मधील भक्तांनी दिलेले चांदीचे सिंहासन, अभिषेक पात्र हे देहू देवस्थान संस्थाने स्वीकारावे असे हभप चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले.
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आ. अण्णा बनसोडे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक यांनी चांदीचे सिंहासन, अभिषेक पात्र, मखर व पुजा साहित्य असे एकूण २१ किलो चांदीचे साहित्य तयार करण्यात आले आहे. या सिंहासनाचे पिंपरी चिंचवड मधील भक्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी शनिवारी ( दि.१८ जून) सिंहासनाची मिरवणूक काढून पूजा व इतर धार्मिक कार्यक्रम चिंचवड येथे करण्यात आले.
त्यानिमित्त शनिवारी आ. अण्णा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर झालेल्या धार्मिक कार्यक्रमात हभप देगलूरकर बोलत होते.