१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाल्यापासून भारताने शेजारी देशांचे मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. चीन व पाकिस्तान वगळता भारताने शेजारी देशांशी नेहमीच मैत्रीचे संबंध राहिले आहेत मात्र मागील काही वर्षांपासून चीन आणि पाकिस्तान या शत्रू राष्ट्रांनी भारतच्या शेजारी देशांना फितवून स्वतःच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे. याआधी चीनने भारताचा सख्खा शेजारी असलेल्या नेपाळला फितवून भारताविरुद्ध भूमिका घ्यायला भाग पाडले. आता चीनचे हेच धोरण पाकिस्तान अवलंबवित असून पाकिस्तानने याआधी आखाती देशांना फितवण्याचे काम केले आता त्यांनी म्यानमार या देशाला भारताविरुद्ध फितवून स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे व त्यात ते बऱ्याच प्रमाणात यशस्वीही ठरले आहेत.
म्यानमारमधील सत्ता पालटानंतर पाकिस्तानने संधी साधून म्यानमारसोबत संरक्षण भागीदारी विकसित करण्याचा दिशेने पाऊल टाकले. लोकशाहीवादी पक्षांचे सरकार असताना भारताचे म्यानमारशी मधुर संबंध प्रस्थापित झाले होते. आता मात्र तिथे लष्कराशाही असून लष्कराचे राज्य आहे. जेंव्हा म्यानमारमध्ये लष्कराने बंड केले होते तेंव्हा भारत लोकशाहीच्या बाजूने उभा राहिला होता हाच राग मनात धरून तेथील लष्कराने आता भारताशी संबंध तोडून पाकिस्तानशी संधान बांधले आहे.
पाकिस्ताननेही मग म्यानमार मधील लष्कराशी हातमिळवणी करून एक पाऊल पुढे टाकले आहे. म्यानमारच्या हवाई दलाला अधिक सक्षम करण्यासाठी पाकिस्तानने मदतीचा हात देऊ केला आहे. लवकरच पाकिस्तानमधील पंधरा हवाई दलातील तज्ज्ञांची टीम मंडाले हवाई स्टेशनला भेट देणार आहे. ही टीम चीनमध्ये बनलेल्या जे एफ १७ फायटर जेट साठी म्यानमारच्या हवाई दलाला प्रशिक्षण देणार आहे. पाकिस्तानमधल्या तज्ज्ञांची ही टीम यंगानमधल्या मिंगलांडॉन एअरफोर्स स्टेशनलाही भेट देणार आहे. तिथे ते जेएफ १७ जेटशी संबंधीत तांत्रिक समस्याही तपासणार आहे.
पाकिस्तानकडून म्यानमारला मदत करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी पाकिस्तानने मे महिन्यात म्यानमारला मालवाहू जहाजाने जेएफ १७ जेटचे काही भाग पुरवले होते. २०१५ मध्ये पाकिस्तान एरोनॉटिकल कॉम्प्लेक्स आणि चीनच्या चेंगडू एरोनॉटिकल ग्रुप्सने संयुक्तपणे विकसित केललं जेएफ १७ थंडर लढाऊ विमान आयात करणारा म्यानमार हा पहिला देश ठरला. पाकिस्तान म्यानमारमधील लष्करी संबंध काढल्याने भारताने घाबरून जाण्याचे कारण नसले तरी हे सबंध भारतासाठी चिंताजनक मात्र नक्कीच आहे. कारण मागील काही वर्षांपासून भारताचे शेजारी देशांशी असलेले संबंध मधुर राहिले नाही. चीन, पाकिस्तान हे तर आपले शत्रू राष्ट्रच आहे पण आता नेपाळशीही आपले संबंध बिघडले आहेत.
श्रीलंकेसोबतही आपले पूर्वीप्रमाणे मैत्रीचे संबंध राहिले नाहीत. आता म्यानमारनेही पाकिस्तानशी संधान बांधले आहे. भाजपच्या प्रवक्त्यांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत त्यामुळे आखाती देशही भारतावर नाराज आहेत. त्यामुळे भारताचे शेजारी देशांशी असलेल्या संबंधात कटुता निर्माण झाली हे मान्यच करावे लागेल आणि तीच चिंतेची बाब आहे.
श्याम ठाणेदार दौंड
जिल्हा पुणे ९९२२५४६२९५