जत, संकेत टाइम्स : भारत सरकार निति आयोग प्रमाणित आणि महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार जत तालुक्यातील बाबरवस्ती (पांडोझरी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मिळाला आहे.राळेगणसिद्धी येथे पार पडलेल्या संस्थेच्या अधिवेशनात हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याबद्दल या शाळेचे कौतुक होत आहे.
पर्यावरण संरक्षण काळाची गरज व आपले कर्तव्य तसेच समाजसेवा ही आपली सामाजिक बांधिलकी आहे जाणून शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच पर्यावरणावर कार्य करत असलेल्या बाबरवस्ती शाळेला शैक्षणिक विभागात केलेल्या उल्लेखनिय कार्याबाबत ‘पर्यावरण मित्र’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाळेने एक हजारांहून झाडे लावून प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे संवर्धन केले आहे. याशिवाय पर्यावरण पोषक उपक्रम वर्षभर राबवले जातात.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पर्यावरण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे, सचिव दीपक काळे, माजी जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रिया महेश शिंदे, माहिती व जनसंपर्क प्रमुख डॉ. विनोद खाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतिलाल साळुंखे, शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख, तानाजी गवारी, केंद्र प्रमुख रमेश राठोड, रामचंद्र राठोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य ,ग्रामस्थ यांनी शाळेला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
आपल्या प्रमुख भाषणात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुरस्कार मिळण्यासाठी काम करू नका, तर आचार, विचार प्रामाणिक ठेऊन काम करा, झाडं लावा, झाडं जगवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, पुरस्कार तुमच्या मागे येतील, अशा शब्दांत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास राष्ट्रीय पर्यावरण संस्थेचे राज्य, जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.