प्रदूषित नद्यांची चिंता कुणाला?

0
Post Views : 72 views
भारतीय संस्कृतीत अनादी काळापासून नद्यांना विशेष महत्त्व आहे.  असे मानले जाते की सकाळी पवित्र नद्यांचे स्मरण केल्यास जीवनात यश मिळते. नद्यांनी संस्कृतीच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.  भारतीय संस्कृतीत नद्यांना देवी समतुल्य मानले जाते.  गंगेसह अनेक नद्यांचा उगम देवतांशी जोडला गेला आहे.  दैवी शक्तींच्या अस्तित्वाचा संबंध नद्यांच्या प्रवाहाशी जोडण्यामागे कदाचित नद्यांचे महत्त्व आपण स्वीकारले पाहिजे हा हेतू असावा. मानवी संस्कृतीचा विकासही नद्यांच्या काठीच झाला.  काळाच्या ओघात पाण्याच्या सहज उपलब्धतेमुळे नद्यांच्या काठावरील वसाहतींची रचना दाट होत गेली.  हळूहळू या वसाहतींनी मोठ्या शहरांचे रूप धारण केले.

 

पृथ्वीवरील सर्व जलस्रोतांपैकी सत्त्याण्णव टक्के पेक्षा जास्त खारे पाणी आहे आणि बाकीचे बहुतेक हिमनगांच्या रूपात गोठलेले आहेत.या गोठलेल्या जलस्रोतांमधून बहुतांश प्रमुख नद्या उगम पावल्या आहेत.  पृथ्वीवरील लोकसंख्येचा मोठा भाग पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी नद्यांवर अवलंबून आहे.  यामुळेच प्राचीन काळी नद्यांच्या प्रवाहाची शुद्धता राखण्याकडे विशेष लक्ष दिले जात असे. असं म्हटलं जातं की, ज्योतिषशास्त्राच्या सामान्य समजुतीनुसार नद्यांच्या पाण्यात घाण टाकणाऱ्याला मातृ ऋणाचा शाप मिळतो. लोकांनी नद्यांच्या पाण्यात घाण टाकू नये, ही या श्रद्धेमागची मानसशास्त्रीय वस्तुस्थिती आहे.  पण आपण पारंपारिक समज नाकारल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या नद्या एकेकाळी पवित्र मानल्या जात होत्या त्या नद्यांमध्ये डुबकी मारल्याने सगळे पाप धुतले जातात अशी अंधश्रद्धा पसरवली.
आणि आज याच नद्या इतक्या प्रदूषित झाल्या की यातले पाणी पिण्यायोग्यही राहिले नाही.
 तार्किक असण्याच्या आग्रहात परंपरा समजून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आम्ही आंधळेपणाने त्यांचे अनुसरण करू लागलो.  प्राचीन काळी नद्यांवरच्या पुलावरून जाणारे प्रवासी नद्यांबद्दलची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी नदीच्या पाण्यात काही नाणी टाकत असत.  हा तो काळ होता जेव्हा नाणी तांबे किंवा चांदीची होती.  तांबे आणि चांदीमध्ये पाणी शुद्ध करण्याचे नैसर्गिक गुणधर्म आहेत. म्हणजेच प्रतीकात्मक दृष्ट्या मानव नदीच्या पाण्याची शुद्धता राखण्याच्या विधीमध्ये अंशतः हातभार लावत असे.  पण नंतर याच पाण्यात शिसे किंवा इतर धातूंची नाणी टाकली जाऊ लागली. नद्या आपली पापे धुवून टाकतात ही श्रद्धाही त्यांच्या प्रदूषणाचे कारण बनली.

 

कोरोनाच्या काळात हजारो अर्धे जळालेले किंवा न जळलेले मृतदेह नद्यांमध्ये फेकण्यात आले.  यातून नदीचे पाणी किती प्रदूषित झाले असेल याची कल्पना करा?गेल्या काही दशकांमध्ये नद्यांमधील प्रदूषण झपाट्याने वाढले आहे.  ही देखील गंभीर चिंतेची बाब आहे कारण त्याचा थेट परिणाम मानवांवर होत आहे.  जर नद्या प्रदूषित झाल्या आणि त्या टिकल्या नाहीत तर आपण पृथ्वीवर कसे जगू?  आज ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि बहुतांश नद्या प्रदूषणाचा सामना करत आपले दिवस मोजत आहेत, हा एक मोठा इशारा आहे.  काही काळापूर्वी सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की भारतातील बहुतेक नद्यांच्या पाण्यामध्ये शिसे, कॅडमियम, आर्सेनिक, निकेल, क्रोमियम, लोह आणि तांबे यांचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा जास्त आहे.सर्वेक्षणात एकशे सतरा नद्या आणि उपनद्यांमध्ये पसरलेल्या निरीक्षण केंद्रांच्या एक चतुर्थांश नमुन्यांमध्ये दोन किंवा अधिक विषारी धातूंचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले.  या प्रदूषणासाठी खाणकाम, भंगार उद्योग आणि विविध धातुकर्म उद्योगांद्वारे पर्यावरणात सोडले जाणारे विषारी धातू कारणीभूत आहेतच, परंतु आपली आधुनिक जीवनशैलीही याला जबाबदार आहे.
गंगेसारखी नदी, तिच्या एकूण प्रवाहाच्या सुमारे अडीच हजार किलोमीटर क्षेत्रफळाच्या सुरुवातीलाच प्रदूषित होऊ लागते.उत्तराखंडच्या साडेचारशे किलोमीटरच्या प्रवाहात डझनहून अधिक नाल्यांतून पंचेचाळीस कोटी घन लिटरहून अधिक घाण पाणी गंगेत सोडले जाते.  उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्येही हेच वर्तन या पवित्र नदीला सहन करावे लागत आहे.  गंगा ही जगातील दहा सर्वाधिक प्रदूषित नद्यांपैकी एक असल्याचे आढळून आले आहे.आणखी एका अभ्यासात असे आढळून आले आहे की गंगा नदी ही जगातील सर्वात जास्त कचरा समुद्रात वाहून नेणाऱ्या नद्यांपैकी एक आहे.

 

कल्पना करा, जी नदी जीवनदायी आहे असे म्हटले जाते, त्या नदीच्या बाजूने समुद्रात जाणाऱ्या कचऱ्याचा पर्यावरणावर आणि जलचर प्राण्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होत असेल?  गंगासारख्या नदीची ही अवस्था असेल तर इतर नद्यांच्या दुर्दशेची काय अवस्था असेल. यमुनेत उठणारा पांढरा फेस तिच्या प्रदूषणाची कहाणी सांगतो.  एकेकाळी झारखंडची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या दामोदर नदीचे पाणी इतके प्रदूषित झाले आहे की, खुद्द पर्यावरण विभागाच्या म्हणण्यानुसार अनेक ठिकाणी तिचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही.  सुवर्णरेखा नदीला एकेकाळी झारखंडची गंगा म्हटले जायचे, पण आता ती आंघोळीसाठीही लायक राहिलेली नाही.
मध्य प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार अमरकंटकमध्ये नर्मदा सर्वाधिक प्रदूषित आहे.
अमरकंटक, ओंकारेश्वर यांसारख्या तीर्थक्षेत्रांच्या नर्मदेच्या पाण्यात क्लोराईड आणि विद्राव्य कार्बन डायऑक्साइडची पातळी चिंताजनक बनली आहे. महाराष्ट्रातील पंचगंगा, भीमा आदी नद्या मोठ्या प्रदूषित बनल्या आहेत. उत्तर प्रदेशातील पूर्वांचलला हिरवेगार ठेवणाऱ्या डझनहून अधिक नद्या मृतावस्थेत आहेत.  गोमती, पीलीनदी, मागाई, गदई, तामसा, विशाही, चंद्रप्रभा, सोन नदी आदींची अवस्था बिकट आहे.किंबहुना, पवित्र नद्यांच्या काठावरील काही समारंभ आणि विधी पाण्याच्या प्रदूषणासाठी काही कमी जबाबदार नाहीत, कारण आपण पूजा साहित्य किंवा पूजेत वापरल्या जाणार्‍या मूर्ती पाण्यात विसर्जित करता येतील या विचाराने नदीत टाकतो. पाण्यात वस्तू टाकून प्रावाहित केल्याने पाप लागणार नाही,असे मानतो. मात्र असे करत असताना आपण हे विसरतो की हे पदार्थ तयार करताना वापरलेली रसायने किंवा काही घटक पाण्याला गुदमरून टाकण्याचे काम करतात.

 

विषारी धातूंबरोबरच नद्यांच्या पाण्यात  रासायनिक औषधांमुळेही प्रदूषणात अत्यंत वाईट प्रकारे वाढ होत आहे.  जगातील सर्व खंडांतील एकशे चार देशांतील दोनशे अठ्ठावीस नद्यांवर केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.  या संशोधनात जगातील शंभरहून अधिक शास्त्रज्ञांचा सहभाग होता.  आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नद्यांच्या पाण्यात अपस्मारविरोधी औषध कार्बामाझेपिन, मधुमेहावरील औषध मेटफॉर्मिन आणि कॅफिनसह विविध औषधांचे घटक धोकादायक प्रमाणात आढळून आले. हे घटक मानवी कचरा, प्रक्रिया न केलेला मलनिस्सारण, नदीकाठचा कचरा किंवा औषध कंपन्यांकडून प्रक्रिया न केलेला कचरा नद्यांमध्ये प्रवेश करतात.  एकोणीस टक्के ठिकाणी, संशोधकांना धोकादायक पातळीवर नदीच्या पाण्यात जैव-प्रतिरोधक आढळून आले आहे. ही पर्यावरणासाठी एक नवीन जागतिक समस्या म्हणूनही उदयास येत आहे.भारतातील नद्यांच्या नमुन्यांमध्ये कॅफिन, निकोटीन, वेदनाशामक, अँटीबायोटिक्स, अँटी डिप्रेसंट्स, अँटी-डायबेटिक, अँटी-अॅलर्जिक औषधे आढळून आली आहेत.  नद्यांमधील औषधांमुळे वाढणारे प्रदूषणही संवेदनशील लोकांना घाबरवू लागले आहे, कारण या प्रदूषणाचा अप्रत्यक्षपणे करोडो लोकांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.