सांगली : भविष्यातील ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने नवनवीन ऊर्जा स्त्रोतावर भर देणे आवश्यक आहे. सौर ऊर्जा हा एक अपारंपारिक व स्वच्छ ऊर्जेचा अक्षय स्त्रोत आहे. या स्त्रोताचा पुरेपूर वापर ऊर्जा समृध्द होण्यासाठी मोलाचा ठरणार आहे. आता आपल्या छतावर सौरसंच (सोलार रुफटॉप) उभारून वीज निर्मितीची संधी उपलब्ध आहे. घरगुती, समूह गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना याकरीता केंद्राचे 40 टक्केंपर्यंत अनुदानही आहे. तरी या योजनेचा इच्छूक घरगुती ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.
महावितरणकडून योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. सांगली मंडळासाठी उपकार्यकारी अभियंता श्री. प्रवीण दीक्षित (संपर्क क्र. 7875769425 ) यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अद्यापर्यंत सांगली जिल्ह्यातील 85 घरगुती वीज ग्राहकांनी 206 किलोवॅट सौर छत यंत्रणा बसविण्यासाठी अर्ज सादर केले आहेत.
केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाच्या सोलार रुफ टॉप टप्पा 2 अंतर्गत घरगुती ग्राहकांना 1 ते 3 किलोवॅटपर्यंत (केडब्लू) सौरछत संच / सोलार रुफटॉपकरीता 40 टक्के तर पुढील 3 पेक्षा अधिक ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान आहे. सामुहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत मात्र प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेत समूह गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 टक्के अनुदान मिळणार आहे. सौरछत संच / सोलार रुफटॉप अनुदानासाठी प्रती किलोवॅट प्रमाणे संचाचे मुलभूत दर पुढीलप्रमाणे निश्चित केले आहेत. 1 ते 3 किलोवॅटकरीता रू.41400/-, 3 पेक्षा अधिक ते 10 किलोवॅटकरीता रू.39600/-, 10 ते 100 किलोवॅट करीता रू.37000/- तर 100 ते 500 किलोवॅटकरीता रू.35886/- असे दर आहेत.