जतमध्ये शिष्याचे गुरू विरोधात बंड | आ.गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची घोषणा

0

 

जत,संकेत टाइम्स : भाजपचे नेते, माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष, जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील पवार यांनी आपले राजकीय गुरू विलासराव जगताप यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण फडकाविले आहे. यापुढे जगताप यांच्याऐवजी आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जतमध्ये भविष्यात भाजपमध्ये कार्यरत राहणार असल्याचे जाहीर केले आहे. पवार यांनी त्यांच्या समर्थकांसह आ. पडळकर यांची झरे येथे भेट घेत आपला निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर उपस्थित होते.

 

जतच्या राजकीय पटलावर गुरू- शिष्याची जोडी म्हणून विलासराव जगताप व सुनील पवार यांना ओळखले जाते. जगताप यांनी मूळचे सनमडी येथील रहिवाशी असलेले सुनील पवार यांना २०१२ साली येळवी पंचायत समिती गणातून निवडणूक रिंगणात उतरावले. काँग्रेसचे शिवाजी आवटे यांचा पराभव करून राजकारणात एन्ट्री केलेले सुनील पवार यांनी आजतागायत राजकारणात कधी मागे वळून पाहिले नाही. २०१७ च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पत्नी सुनीता पवार या बनाळी गटातून विजयी झाले. अखेरच्या टप्प्यात जगताप यांनी सुनीता पवार यांना महिला व बालकल्याण सभापतीपदी संधी दिली. दुसऱ्या बाजुला भाजप तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सुनील पवार यांच्याकडेच होती. सुनील पवार यांचे बंधू विनोद पवार यांना जिल्हा बँकेसाठी उमेदवारी देण्यात आली होती पण त्यांचा अर्ज अवैध ठरल्याने त्याजागी प्रकाश जमदाडे यांना संधी देण्यात आली होती. एकूणच जतच्या राजकारणात जगतापांच्या निष्ठेमुळे पवार ब्रँड पावरफुल्ल ब्रँड म्हणून उदयास आला होता.

 

जगताप यांचे निष्ठावंत म्हणून पवार ओळखले जायचे. जगताप यांचा आदेश शिरसावंद्य मानून त्यांनी मागील दहा वर्षात स्वतःला झोकून देवून काम केले. जगताप साहेब हाच आमचा पक्ष आम्ही बाकी कोणाला ओळखत नाही असे खडे बोल त्यांनी भाजपच्या वरिष्ठांना थेट सुनावले होते. सारे सुरळीत चालू असताना नेमकी माशी कुठे शिंकली समजले नाही. आपल्या सडेतोड स्वभावाने जिल्ह्याच्या राजकारणात आपला वेगळा दबदबा निर्माण करणारे विलासराव जगताप व सुनील पवार यांच्यात जिल्हा बँकेपासून किरकोळ धुसफूस सुरूच होती. अखेर विलासराव जगताप यांनी सुनील पवारांचा राजीनामा घेत या अंतर्गत वादाला अर्धविराम दिला खरा पण सुनील पवार यांनी पलटवार करत जगताप यांच्या नेतृत्वाला आव्हान देत आ. गोपीचंद पडळकर यांची भेट घेत आपण यापुढे गोपीबंधनात काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. पवार यांच्या या निर्णयाने त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाच्या चर्चेला विराम मिळाला आहे.

 

https://sankettimes.com/21277/

 

Rate Card

सुनील पवार यांच्यासह सतिश बुवा, शिवानंद हाके, शहाजी कोडग, माणिक दादा,महादेव सलागर, ज्ञानेश्वर अटपाडकर,भानुदास राजगे,अशोक गायकवाड मनगु सलगर,तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन व प्रमुख पदाधिकारी यांनी आ. पडळकर यांची भेट घेतली होती. भेटीवेळी आ. पडळकर यांनी त्यांचे जंगी स्वागत करत पवारांना बळ देणार असल्याचे यावेळी जाहीर केले.

एकूणच जतच्या राजकीय पटलावर आ.पडळकर यांना जवळ केल्याने भविष्यात पवार गट हा जगताप नव्हे तर पडळकर समर्थक म्हणून भाजपच्या गोटात ओळखला जाणार आहे. सुनील पवार व त्यांच्या समर्थकांनी जगताप यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा फडकाविला असला तरी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पवार गटाचा कस लागणार आहे त्यानंतरच गुरू की शिष्य वरचढ हे स्पष्ट होणार आहे.

 

दो हंसोच्या जोडीनंतर गुरू- शिष्याची जोडी फुटली

जतच्या राजकारणात सुनील पवार व जि. प. सदस्य सरदार पाटील हे दो हंसो का जोडा म्हणून ओळखले जात होते. किती बी आले गेले पण आम्ही एकच म्हणारे ही जोडगोळी फुटली. सरदार पाटील यांनी विलासराव जगताप यांना रामराम ठोकत काँग्रेस गोटात प्रवेश केला. त्यानंतर आता सुनील पवार यांनी जगतापांना सोडचिठ्ठी देत आ. पडळकर यांच्या गोटात प्रवेश केल्याने जगताप-पवार ही गुरू-शिष्याची जोडी फुटली आहे.

 

■आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार- सुनील पवार

 

जत भाजप तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण समर्थकांसह आ. गोपीचंद पडळकर यांची भेट घेतली. यापुढे आ. पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मकरंद देशपांडे यांचा मार्गदर्शनाखाली जत तालुक्यातील गोरगरीब, वंचितांसाठी काम करणार आहे. आ. पडळकर यांचा आदेश अंतिम मानून काम करणार असल्याचे सुनील पवार यांनी सांगितले.
■■

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.