सांगली : सांगली जिल्ह्यात जलशक्ती अभियानांतर्गत सर्वच यंत्रणांनी केलेली कामे योग्य पध्दतीने झाली असून यासाठी सर्व यंत्रणांमध्ये असलेला समन्वय अतिशय चांगला आहे. या अभियानांतर्गत जनतेला अपेक्षित व उपयुक्त असणारी कामे लोकसहभाग घेवून प्राधान्याने पूर्ण करा. यासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक पध्दतीने प्रयत्न केले जातील. तसेच शासनाकडून विविध यंत्रणांना दिलेले उद्दिष्ट विहीत वेळेत व शासनाच्या नियमानुसार दर्जेदार कामे करून पूर्ण करा, असे आवाहन केंद्रिय गृहमंत्रालयाचे उपसचिव तथा जलशक्ती अभियानाचे नोडल अधिकारी धर्मराज खाटीक यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जलशक्ती अभियानाच्या कामांचा आढावा केंद्रिय गृहमंत्रालयाचे उपसचिव धर्मराज खाटीक यांनी घेतला. यावेळी जलशक्ती मंत्रालयाचे उपसंचालक डी गणेशकुमार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) गणेश शिंदे तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
केंद्रिय गृहमंत्रालयाचे उपसचिव धर्मराज खाटीक म्हणाले, लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने उपलब्ध पाणी कमी पडत आहे. त्यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यासाठी देशपातळीवर जलशक्ती अभियानाची सुरूवात झाली आहे.
जलसंधारणाच्या सर्व कामांना एकत्रित करून जलशक्ती अभियान सुरू झाले आहे. यामध्ये देशातील दुष्काळी जिल्ह्यात पावसाचे पाणी साठविण्याचे उपक्रम सुरू करण्यात येत असून रेन वॉटर हार्वेस्टींगवर भर देण्यात येत आहे. यामुळे या अभियानाची योग्य पध्दतीने अंमलबजावणी करावी. त्यासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश केंद्रिय गृहमंत्रालयाचे उपसचिव तथा जलशक्ती अभियानाचे नोडल अधिकारी धर्मराज खाटीक यांनी दिले.




