तासगाव, संकेत टाइम्स : तासगाव येथील डॉ. अंजली पाटील यांच्या सरस्वती आनंद हॉस्पिटलमधून एक दिवसाच्या चिमुरड्या बालकाचे अपहरण करण्यात आले होते. त्याच हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करणाऱ्या स्वाती माने हिने हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले होते. याप्रकरणात पोलिसांनी अतिशय संवेदनशीलपणे तपास केला. संशयित माने यांना गजाआड करीत मायलेकरांची अवघ्या आठ तासात भेट घालून दिली. ही कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी कौतुकाची थाप टाकली आहे. सर्वांचा आज पोलीस मुख्यालयात सत्कार करण्यात आला. पोलिसांच्या या कामगिरीमुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावल्याची भावना यावेळी गेडाम यांनी व्यक्त केली.
तासगाव येथील डॉ. अंजली पाटील यांच्या सरस्वती आनंद हॉस्पिटलमध्ये चिंचणी (ता. तासगाव) येथील एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. तर याच हॉस्पिटलमध्ये स्वाती माने ही महिला परिचारिका म्हणून कामावर रुजू झाली होती. चिंचणी येथील ‘त्या’ महिलेचे सीझर करण्यात आले. तिला मुलगा झाला. मात्र परिचारिका म्हणून काम करणाऱ्या माने यांनी एक दिवसाच्या चिमुरड्याचे अपहरण केले. या प्रकाराने जिल्हाभरात खळबळ उडाली.
या घटनेनंतर जिल्ह्याचे पोलीस दल ऍक्शन मोडवर आले. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी कोणत्याही परिस्थितीत अपहरण करणाऱ्या महिलेसह ‘त्या’ नवजात बालकाला सुखरूप शोधून काढण्याच्या सूचना दिल्या. यानंतर तासगाव, विटा येथील पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी झपाटून कामाला लागले. सगळे खबऱ्या, गुप्तचर यंत्रणा कामाला लावली. अखेर आठ तासांच्या थरारानंतर ‘त्या’ महिलेला बालकासह पकडण्यात आले.
या आठ तासात पोलिसांनी अक्षरशः जीवाचे रान केले. मायलेकरांची भेट घडवून आणण्यासाठी दिवसभर पोटात अन्नाचा कणही नसताना पायाला भिंगरी बांधून पोलिसांनी हा आव्हानात्मक तपास पूर्ण केला. पोलिसांच्या या अद्वितीय कामगिरीनंतर अखंड पोलीस दलावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. या कामगिरीनंतर पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनीही ही कामगिरी करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आज मुख्यालयात बोलावून सत्कार केला. सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. यापुढेही अशाच कामगिरीची अपेक्षा व्यक्त केल.