म्यानमारमध्ये लोकशाहीची हत्या                 

0
म्यानमार अर्थात पूर्वीच्या ब्रम्हदेशात लोकशाहीवादी कार्यकर्ते आणि लष्करशाही यांच्यातील संघर्ष नवा नाही. मागील पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ हा संघर्ष चालू आहे अर्थात या संघर्षात लष्करशाहीच वरचढ ठरली आहे कारण त्यांनी शास्त्रांच्या वापर करून  ही लढाई लढली तर लोकशाहीवादी कार्यकर्त्यानी लोकशाहीच्या आयुधांचा वापर करून म्हणजे मोर्चे, निवेदने, आंदोलने, सत्याग्रह,  निवडणुका यांचा वापर करुन ही लढाई लढली. या लढाईत शास्त्रांच्या बळावर लष्करशाहीने लोकशाहीवादी कार्यकर्त्यांचा  आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच गेली अनेक वर्षे तिथे लष्करशाहीचेच राज्य आहे. वास्तविक तेथील जनताही लष्करशाहीस कंटाळली असून त्यांनाही तिथे लोकशाहीच हवी आहे त्यासाठी तिथे आंदोलने होतात या आंदोलनाचे नेतृत्व तेथील लोकशाहीवादी कार्यकर्त्या आंग सान स्यू की या करतात. आंग सान स्यू की यांना तेथील लष्कराने अनेक वर्षे तुरुंगात डांबून ठेवले होते.
अनेक वर्षे तुरुंगात राहून जेंव्हा त्या बाहेर आल्या तेंव्हा त्यांनी जनतेला जागृत केले जनतेला सोबत घेऊन त्यांनी  लष्कर शाही विरुद्ध आवाज उठवला. म्यानमारची जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. २०१९ साली  म्यानमारमध्ये निवडणूका झाल्या. या निवडणुकीत लोकशाहीवादी आंग सान स्यु की यांच्या पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. त्या म्यानमारच्या पंतप्रधान बनल्या. म्यानमारमध्ये लोकशाही आली. जनतेनेही या सरकारचे स्वागत केले. आंग सान स्यु की  यांना जनतेचा पाठींबा मिळत आहे हे दिसताच तेथील लष्करप्रसुख मिन आंग हायलीन यांचे पित्त खवळले. म्यानमारची जनता लोकशाहीला पाठिंबा देत असल्याने त्यांच्या पाया खालची जमीन सरकू लागली. आपल्या हातातून  सत्ता कायमची जाणार हे लक्षात येताच त्यांनी निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत १ फेब्रुवारी २०२१ रोजी आंग सान  स्यु की यांना भल्या पहाटे अटक केली.
सकाळी झोपेतून उठल्यावर लोकांना समजले की सत्ता पालट झाली असून आंग सान स्यु की यांना लष्कराने अटक केली असून लष्करशाहीची पुन्हा सत्ता आली आहे. या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली. ज्यांनी या निर्णयाला विरोध केला त्यांचा विरोध लष्कराने मोडून काढला.  अनेकांना अटक केली. मागील दीड वर्षात म्यानमारमध्ये अक्षरशः दडपशाही चालू आहे. मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या असिस्टंट  असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिझन या संस्थने दिलेल्या अहवालानुसार म्यानमारमध्ये लष्करशाही आल्यापासून तिथल्या सुरक्षा यंत्रणांनी जवळपास २ हजार १००  लोकांना ठार केले आहे. या हत्या म्हणजे लोकशाहीचीच हत्या आहे कारण हत्या झालेले सर्वजण हे लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. लोकशाहीसाठी या लोकांनी अनेकदा आंदोलने केली होती.

 

लष्कराचे कौर्य इतक्यावर थांबले नाही तर आंग सान स्यु की यांचे समर्थक माजी खासदार जिमी  लो यांग आणि यांग धुरा जांग यांना दोनच दिवसांपूर्वी फाशीची शिक्षा दिली. त्यांना फाशी का दिली याचेही स्पष्टीकरण तेथील सरकारने दिले नाही. त्यापेक्षाही आश्चर्य म्हणजे त्यांना फाशी देताना त्यांच्या कुटुंबियांना साधी कल्पना देखील देण्यात आली नाही. अशाप्रकारे म्यानमारमध्ये सध्या लोकशाहीची खुलेआम हत्या चालू आहे. विशेष म्हणजे म्यानमारमध्ये सध्या लोकशाहीची जी हत्या चालू आहे त्याविषयी जग मात्र डोळे मिटून शांत बसले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने देखील यावर चकार शब्द काढला नाही इतकेच नाही तर लोकशाहीचे प्रणेते समजले जाणारे ब्रिटन आणि अमेरिका हे देखील मूग गिळून गप्प आहेत.

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.