हवं शुद्ध पाणी,पण नको नासाडी

0
रामरहीम यांनी पाण्याचं महत्त्व अधोरेखित करताना सांगितलं होतं की, रहिमन पानी राखिए, बीन पानी सब सून,पानी गए न ऊबरे , मोती मानुष चून। अर्थात मोती, मानुष म्हणजे मनुष्य आणि चुन्याची चमक तोपर्यंत आहे,जोपर्यंत त्यात पाणी असते.जर या तिन्हींतून पाणी बाजूला केले तर ते तेजहीन, कांतिहीन होऊन जातील. परंतु या ओळी मनुष्य आणि पाणी यांच्याबाबतीत अधिक चपखल बसतात. कवीने याची उद्घोषणा शेकडो वर्षांपूर्वी केली होती. त्यावेळी निसर्ग फारच शानदार होता. पर्यावरणात आजच्या सारखे प्रदूषण घुसले नव्हते. लोकांचे घनत्वही अत्यंत कमी होते. पण माणसाचा स्वभाव असा की, जोपर्यंत संकट चालून येत नाही, तोपर्यंत तो काही शिकण्याच्या भानगडीत पडत नाही. आज देशातील 80 टक्के लोक प्रदूषित पाणी पितात. हा माहिती धक्कादायकच नाही तर भीतीदायकही आहे.

 

 देशातील पिण्याच्या पाण्याचा दर्जा खालावत असल्याची कबुली केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. पिण्याच्या पाण्याबाबत सरकारने राज्यसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार  देशातील सर्व राज्यांतील बहुतांश जिल्ह्यांमध्ये भूगर्भातील पाण्यामध्ये विशिष्ट प्रमाणापेक्षा अधिक विषारी धातू आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणचे पाणी सर्वाधिक प्रदूषित असल्याची बाब समोर आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे आणि भूजलाचे नमूने तपासून पाणी प्रदूषणाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.महाराष्ट्रात तापी नदी सर्वाधिक प्रदूषित आहे. अहवालानुसार ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणचे पाणी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, पुणे, नाशिकमधील अनेक ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. राज्यात तापी नदीनंतर विदर्भात वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या नद्या प्रदूषित आहेत. त्याचबरोबर मुंबईत मिठी, पुण्यातील मुळा-मुठा, ठाण्यातील उल्हास, कोल्हापुरात पंचगंगा या नद्या प्रदूषित आहेत. कोल्हापुरात साखर कारखाने आणि विशेषतः इचलकरंजीतील वस्रोद्योगामुळे पंचगंगेचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे.

 

 जलशक्ती मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील 80 टक्क्यांहून अधिक लोकांना, म्हणजेच दहा पैकी आठ जणांना जमिनीतून पाणी मिळते. भूजलातील घातक धातूंचे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त असल्यास ते पाणी ‘विष’ बनते. भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या खेड्यांमध्ये असल्याने आणि तेथे हातपंप, विहिरी, नद्या, तलाव यातून थेट पाणी मिळत असल्याने ही समस्या अधिक गंभीर आहे.देशात 209 जिल्ह्यांत भूजलामध्ये प्रति लिटर  0.01 मिलीग्रॅमपेक्षा जास्त आर्सेनिक आढळून आले. 491  जिल्ह्यांत भूजलातील लोहाचे प्रमाण प्रति लिटर एक मिलीग्रॅमपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. 11 राज्यांतील 29 जिल्ह्यांमध्ये भूजलातील कॅडमियम 0.003 मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा अधिक, तर 16 राज्यांतील 62 जिल्ह्यांतील काही भागांमध्ये क्रोमियमचे प्रमाण 0.05  मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा जास्त आहे. 152 जिल्ह्यांत भूजलात 0.03 मिलीग्रॅम प्रति लिटर युरेनियम जास्त आहे.निरोगी राहण्यासाठी व्यक्तीने दिवसातून किमान दोन लिटर पाणी प्यावे. मात्र, प्रदूषित पाणी प्यायल्यास त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. कर्करोग, किडनीचे आजार होऊ शकतात. त्यामुळे पाणी शुद्ध करूनच प्यावे लागणार आहे.

 

आज संपूर्ण जगात पेयजल संकटाचा विषय खूपच गहन बनला आहे. कुठे तो भूजल स्खलन रूपाने तर कुठे नद्यांच्या प्रदूषण रूपाने पाहायला मिळतो. सुकलेले तलाव आणि आकसलेली सरोवरे पाहायला मिळतात. तर जलस्तरही घटत चालला आहे. आज संपूर्ण युरोपातील 60 टक्के औद्योगिक क्षेत्रे आणि शहरी केंद्रे  भूजल घटाच्या गंभीर समस्येचा सामना करत आहेत. आणखी काही देह  अशाच गंभीर समस्येला तोंड देत आहेत. पेयजल संकट  म्हणजे निसर्गाच्या आणि त्यांच्या संसाधनांच्या अनावश्यक खर्चाचा परिपाक आहे. दरवर्षी वाढत्या तापमानामुळे पृथ्वीचा जलस्तर तीन मीटरने खाली जात आहे. बदलत्या पर्यावरणाने काही ठिकाणे वाळवंटात रूपांतरित झाली आहेत. अशा भयाण परिस्थितीत पाण्याची बचत हीच आजची सर्वात मोठी गरज आहे.परंतु पाण्याच्या कमतरतेचे संकट आपल्या डोक्यावर टांगले असतानाही लोकांचे ध्यान जाताना दिसत नाही. आज पाण्याच्या शुद्धतेच्यादृष्टीने अनेक प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छ पाण्यासाठी बहुतेक माणसे (शहरात राहणारे) घरी आणि कार्यालयात आरओ फुरिफायरचा वापर करतात. यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. आरओमुळे पाणी बरेच शुद्ध होत असले तरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, काही आरओ फ्युरिफायर पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत सुमारे तीन पट पाणी वाया घालवतात. पण जर आपण थोडी काळजी घेतल्यास आणि समजुतदारपणा दाखवल्यास पाणी गटारीत सोडून वाया घालवण्यापेक्षा त्याचा उपयोग अन्य कामासाठी केल्यास नासाडी होणाऱ्या पाण्याचा सदुपयोग होईल. धुणीभांडी, कपडे धुणे, फरशी पुसणे अशा अनेक कामांसाठी हे पाणी उपयोगाला येऊ शकते.

 

Rate Card
वास्तविक आरओची आवश्यकता अशा ठिकाणांसाठी योग्य आहे, जिथे पाणी खूपच खारे आहे. आरओ मशीनचा सर्वात पहिल्यांदा वापर 1949 साली अमेरिकेतील फ्लॉरिडामध्ये झाला होता. या वापरामागचा उद्देश म्हणजे खारे पाणी गोड करणे. नंतर या उपकरणाद्वारा पाण्याची मोठ्या प्रमाणात होत असलेली नासाडी आणि शरीराला आवश्यक असणारे खनिज नष्ट होत असल्याचे परिणाम समोर आले. जिथे पाण्यातील टीडीएसची मात्रा 500 मिग्रॅपेक्षा कमी आहे,तिथे सामान्य फ्युरिफायरच्या मदतीने पाणी शुद्ध करता येते.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.