कुलाळवाडी श्री खंडोबा देवस्थानास निधी द्यावा ; तुकाराम महाराज | तुकाराम बाबा व खंडोबा पुजाऱ्यांच्या हस्ते श्री खंडोबा देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा

0
जत,संकेत टाइम्स : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जत तालुक्यातील कुलाळवाडी येथे श्री खंडोबा देवाचे मंदिर आहे. म्हातारबा देव म्हणून या भागात श्री खंडोबा देवाला ओळखले जाते. या ठिकाणी देवाचे मंदिर आहे पण मूर्ती नव्हती. श्री खंडोबा देवाची मूर्ती बुधवारी मंदिरात बसविण्यात आली. चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज व श्री खंडोबा देवाचे पुजारी यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
श्री खंडोबा देवाचे ( म्हातारबा देव ) मुख्य ठाणे सांगोला तालुक्यातील महूद येथे आहे. महूद येथून देव जत तालुक्यातील घोलेश्वर येथे आला व तेथून कुलाळवाडी येथे देव गेल्याची आख्यायिका आहे. देवाचे मुख्य पुजारी घोलेश्वर येथील कै. गुंडा साधू तांबे होते. त्यांची महूद, घोलेश्वर, कुलाळवाडी येथे भागणूक व्हायची. त्यांची भागणूक ऐकण्यासाठी हजारो भाविक उपस्थित रहायचे. आजही त्यांनी सांगितलेली भागणूक खरी होत आल्याचे भाविक सांगतात. आज त्यांच्या जागी त्यांचे पुत्र बाबासाहेब तांबे पुजारी यांची भागणूक असते.
कुलाळवाडी येथे श्री खंडोबा देवाची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. ५० वर्षापूर्वी देवाची मूर्ती चोरीला गेल्यानंतर आजतागायत तेथे मूर्ती नव्हती. श्री खंडोबा देवस्थान कमेटी व या भागातील भाविकांनी पुढाकार घेत श्री खंडोबा देवाची मूर्ती तयार केली आहे. मंगळवारी देवाची तयार झालेली मूर्ती आणण्यासाठी भाविक मोठया संख्येने पंढरपूरला गेले होते. मूर्ती घेवून भाविक महूद मुख्य ठाणे येथे गेले तेथून घोईश्वर येथे मूर्ती आणण्यात आली. घोलेश्वर येथून श्री च्या मूर्तीचे कुलाळवाडी येथे आगमन झाले. रात्री धनगरी ओव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बुधवारी श्री खंडोबा देवाच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. होम यज्ञ झाल्यानंतर हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते श्री खंडोबा देवाच्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापणा करण्यात आली.
कुलाळवाडी येथील श्री खंडोबा देवस्थानचे रुपडे  श्री खंडोबा देवस्थान कमेटी व या भागातील दानशूर भाविकांनी पलटले आहे. भव्य मंदिर, परिसर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसविण्यात आले आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा तसेच लोकप्रतिनिधीनी या मंदिरासाठी भरीव निधी द्यावा असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.