जत,संकेत टाइम्स : सध्याच्या स्पर्धेच्या युगात नवयुवकांनी आपल्या स्वनपुर्तीसाठी प्रलोभनापासून दूर राहून आपले समृद्ध व उज्ज्वल भविष्य घडवावे आपल्या स्वनपुर्तीसाठी अनेकजण समर्पण करत असतात याची जाणिव ठेवावी तरुणाईच्या या वयात आपल्या हातून घडणारी एक चूक आपल्यासोबतच अनेकांच्या स्वप्नांचा विध्वंस करु शकते यासाठीच सजगतेतून विद्यार्थीनी आपले उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन जत न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश ई.के.चौगले यांनी केले.
शनिवार दि २७ ऑगस्ट २०२२ रोजी तालुका विधी सेवा समिती जत, राज्यशास्त्र विभाग, रॅगिंग प्रतिबंध समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष राजे रामराव महाविद्यालय, जत यांच्या संयुक्त विद्यमाने रँगिंग प्रतिबंध कायदे,वाहतूक नियमन व अंमली पदार्थ प्रतिबंध कायदे”याविषयावरील एकदिवसीय कायदेविषयक कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते.
जत शहरातील उदयोन्मुख विधीज्ञ श्री.धनंजय वाघमोडे यांनी रँगिंग प्रतिबंध कायद्याविषयी माहिती स्पष्ट करताना रँगिंग म्हणजे काय? हे सांगून त्याविषयी कायदा व शासनाची भूमिका याविषयी आपले मत विषद केले व तरुणाईने रँगिंगच्या मोहजालापासून दूर रहावे असे आवाहन केले.
जतचे सह.दिवाणी न्यायाधीश ए.बी.जाधव यांनी न्यायिक क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेसाठी संधी याविषयी मार्गदर्शन केले व पदवी काळातच परीक्षेची परिपूर्ण तयारी करावी असे आवाहन केले.विधीज्ञ रेऊर यांनी आपल्या हलक्या – फुलक्या तसेच ओघवत्या भाषाशैलीत वाहतूक नियमन याविषयी माहिती दिली, वाहतूक नियमांचा काटेकोरपणे पालन करुन आपल्या व दुसऱ्यांच्या जीवाची काळजी घ्यावी असे आवाहन केले व नवीन वाहतूक कायदा व त्याचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या शिक्षेचे स्वरुप याविषयी आपले मत विषद केले.
कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ विधीज्ञ श्री.मुंडेचा यांनी अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदे याविषयी विस्तृत माहिती विषद करताना तरुणाईच्या सळसळत्या काळात व्यसनांच्या आहारी न जाता शाश्वत राष्ट्रबांधणीसाठी आपले योगदान देऊन आपला जन्म सार्थकी लावावा असे आवाहन केले.
या एकदिवसीय कायदेविषयक कार्यशाळेसाठी जत वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी,महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा.डॉ.सुरेश एस.पाटील, सकाळ सत्र प्रभारी.प्रा.सिद्राम चव्हाण,दुपार सत्र प्रभारी प्रा.महादेव करेणवार,सर्व विभागप्रमुख,गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रस्तुत कायदेविषयक कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.भीमाशंकर डहाळके यांनी केले सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक श्री अतुल टिके यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ.निशाराणी देसाई यांनी मानले. महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून ही कार्यशाळा संपन्न झाली.