कृत्रिम बुद्धिमत्ते’चे युग मानवासाठी धोकादायक
पाच वर्षांपूर्वी फेसबुकच्या सॉफ्टवेअर अभियंत्यांनी एक असा प्रयोग केला होता, ज्याने संपूर्ण जग थक्क झाले होते. त्याचं झालं असं की फेसबुकचे अभियंते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मानवी आणि यंत्राच्या मेंदूवर म्हणजेच एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा प्रयोग करत होते. पण या प्रयोगादरम्यान एक अभियंता म्हणाला – चला, माणसांशी नाही तर यांच्याशीच आपसांत संवाद घडवून आणूया’ मग त्यांनी संवाद साधण्यासाठी बाब आणि अॅलिस नावाच्या दोन मशीन मेंदूशी संवाद घडवला.
ते दोघे आपापसात बोलत असताना अभियंत्यांना हे दोघे काय बोलत आहेत ते कळले नाही. पण संशोधनानंतर असे आढळून आले की त्यांनी स्वतःमध्ये एक गुप्त भाषा विकसित केली होती. हा सर्व प्रकार पाहून अभियंत्यांनी तातडीने हा संवादाचा कार्यक्रम बंद केला. या वेळेचा हा वापर अगदी नवीन मानला जातो. तुम्ही कल्पना करू शकता की बाब आणि अॅलिस ज्या प्रकारे मानवांपासून दूर राहून आणि गुप्त भाषा विकसित करून एकमेकांशी बोलत होते तो एक धोकादायक प्रयोग होता. यावरून अंदाज बांधता येतो की कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग पुढे जाऊन मानवासाठी किती धोकादायक असेल?
लाखो लोक नोकऱ्यांसाठी चिंतेत आहेत. खेदाची बाब म्हणजे नोकऱ्यांअभावी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. हे जगभर पाहिले जात आहे. एका अहवालानुसार 2030 पर्यंत 80 कोटी नोकऱ्या जाणार आहेत. डेलॉइटच्या अहवालात असे समोर आले आहे की 2025 पर्यंत दहा लाखांहून अधिक वकील त्यांच्या नोकऱ्या गमावणार आहेत. अशा काही नोकर्या देखील आहेत ज्यांचे काम मशीन माइंड अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे सहज करता येते. 2015 मध्ये गुगलला ड्रायव्हरलेस कार बनवण्यात यश आले. भविष्यात स्वयंचलित कारमध्ये आणखी सुधारणा केल्या जातील आणि चालकांची गरज संपुष्टात येईल.

– मच्छिंद्र ऐनापूरे,जत
