एखादा समाज आणि देश जर आतून पोकरायचा असेल तर तिच्या युवाशक्तीला अंमलीपदार्थांच्या गर्तेत अडकवणं पुरेसं आहे. बाकी फारसं काही करावं लागत नाही. अलीकडच्या काळात देशाच्या विविध भागात पोलिसांचा अंमली पदार्थांच्या साठ्यावर छापा, जप्तीच्या बातम्या आणि या अंमली पदार्थांच्या पुरवठ्याचा मार्गक्रम अशा या सगळ्या बाबींवर नजर टाकली, तर अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेली आपली तरुण पिढी अशाच चक्रव्यूहात फसत चालली असल्याचं दिसत आहे.या प्रकरणावर बारकाईने नजर ठेवल्याने देशात अमली पदार्थांचे मोठे साठे पकडले जात आहेत. एवढेच नाही, तर या नेटवर्कमध्ये कोण कोण सामील आहेत, ड्रग्ज कुठून कुठून आणि कसे येत आहेत या गोष्टी तपासल्यावर ही बाब मोठी गंभीर असल्याचे दिसत आहे. आपल्या देशाच्या कोणत्या भागात आणि समाजातील कोणत्या घटकांमध्ये इतका प्रचंड वापर होत आहे,याचाही अंदाज येत आहे.
देशाच्या विविध भागांतून अमली पदार्थ पकडण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. नुकतेच, मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (अँटी नार्कोटिक्स सेल) गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे एका अंमली पदार्थाच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आणि एक हजार कोटींहून अधिक किमतीच्या पाचशे तेरा किलो अमली पदार्थांच्या साठयांच्या जप्तीसह सात जणांना अटक केली. 3 ऑगस्ट रोजी मुंबईतील नालासोपारा येथून 14 अब्ज रुपयांचे मेफेड्रान-एमडी हे ड्रग्ज पकडण्यात आले होते. ही खेप उच्चवर्गीय तरुणांना विकली जात असल्याची माहिती मिळाली. इतकेच नाही तर या ड्रग्ज रॅकेटमध्ये सामील असलेले लोक सोशल मीडिया आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायासाठी करत आहेत, जेणेकरून त्यांना सहज पकडता येणार नाही.
अंमली पदार्थांचा हा पुरवठा देशाबाहेरील अनेक अड्ड्यांवरून होत असल्याचेही आढळून आलं आहे. गुजरातमधील मुंद्रा आणि पिपावा यांसारखी खासगी बंदरे देशाबाहेरून अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी प्रवेशद्वार बनली आहेत. उल्लेखनीय हे की 2017 ते 2020 या वर्षात गुजरातमध्ये 2.5 लाख कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. याचा अर्थ हा अंमली पदार्थांचा बेकायदा व्यापार किती मोठ्या प्रमाणात देशात पसरला आहे, याची प्रचिती येते. पोलीस किंवा विशेष पथकांनी पकडलेले हे आकडे आहेत.
मग हाताला न लागलेले अंमली पदार्थ अजून कुठे कुठे आणि कसे पोहचत असतील, हे सांगणे अवघड आहे. हे सगळं भयानक आहे. कदाचित याचे एकमेव कारण असे की या व्यापारात गुंतलेल्या लोकांना एकप्रकारे राजकीय आश्रय आहे आणि त्यामुळे या अवैध धंद्यात गुंतलेल्या खऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा कचरतात.
– मच्छिंद्र ऐनापूरे,जत