सांगली: सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील उल्हासनगर बाजारपेठेतील एका बँकेचे एटीएम मशीन फोडून रोकड लांबविणाच्या प्रयत्न करणाऱ्या एकाला कुपवाड पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे. अनिकेत गणेश व्हनकडे (वय १९), राहणार कुपवाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक लहान लोखंडी पहार जप्त करण्यात आली आहे, तर आरोपीने दारुच्या नशेत हे कृत्य केल्याचे कबुली दिली आहे
कुपवाड परिसरातील उल्हासनगर दुय्यम निबंधक कार्यालयाखालील एका गळ्यामध्ये युनियन बँकेच्या सांगली शाखेची एटीएम मशीन आहे. शुक्रवारी रात्री एक ते शनिवारी सकाळी आठ वेळेमध्ये संशयित अनिकेत व्हनकडे याने लहान लोखंडी पहारीसह एटीएम मशीन गाळ्यामध्ये प्रवेश केला. आतमधील रोकड लांबवण्याच्या उद्देशाने त्याने मशीनवर पहारीचे घाव घातले. यामध्ये मशीनच्या बाह्यबाजूची आणि स्क्रीनची तोडफोड झाली.
अथक प्रयत्न करूनही आतमधील रोकड प्राप्त करण्यास त्याला यश आले नाही. अखेर आपले प्रयत्न थांबवून त्याने घटनास्थळाहून पळ काढला. शनिवारी सकाळी मशिनच्या तोडफोडीचा प्रकार उघड झाला. नागरिकांनी याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी वस्तुस्थितीची पाहणी केली. माहिती मिळताच बँक अधिकाऱ्यांनीही धाव घेतली.