वर्धा: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यामध्ये जन्मदात्या बापानेच पोटच्या दोन चिमुकल्या मुलांची हत्या करुन स्वता:ला देखील संपवून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय कांबळे असं मुलांची हत्या करुन आत्महत्या करणाऱ्या वडिलाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील बोर्डा येथे संजय हा खासगी शिकवणी वर्ग चालवीत होता, तर पत्नी प्रेरणा ही शहरातील एका महाविद्यालयात प्रयोगशाळेत नोकरीला आहे. शुक्रवारी मुलगा अस्मित (७) हा शाळा सुटल्यानंतर जवळच घर असलेल्या आजोबा प्रभाकर पेटकर यांच्याकडे गेला होता.
संजयने काही कारण सांगून त्याला घरी आणले, तर लहान मुलगी मिस्टी (३) ही नुकतीच शाळेतून आली होती. संजयने दोन्ही मुलांना आतमध्ये कोंडून त्यांना प्रथम विष पाजले, तेवढ्यावरही त्याचे समाधान झाले नाही तर त्याने दोन्ही मुलांचा गळा आवळला. दोघांचाही मृत्यू झाल्याच शहानिशा करून बाहेरून दाराल कुलूप लावून संजय तिथून निघून गेला.
सायंकाळी मुलांची आई घरी आली असता तिला आपली दोन्ही मुलं मृतावस्थेत दिसली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपासामध्ये वडील संजय कांबळे यानेच आपल्या मुलांची हत्या केल्याचं समोर आलं.
या घटनेनंतर वरोरा पोलिसांनी फरार असलेल्या आरोपी संजय याच्या शोध घ्यायला सुरुवात केली असता, साखरा गावाजवळील मंगरूळ फाट्यालगत शेतात त्याचा मृतदेह शनिवारी आढळून आला.
त्यामुळे मृतक संजय कांबळे याने आधी पोटच्या मुलांची हत्या केली आणि स्वत: देखील विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. मात्र, त्याने एवढं कठोर आणि टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोप आलेलं नाही. गिरड पोलिसांनी याप्रकरणाची नोंद केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.