जतेतील आरोप-प्रत्यारोप म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू ! | – विक्रम ढोणे
जत : वैयक्तिक दोषारोप आणि विकास कामांच्या उद्घाटनावरून विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले. आमदार विक्रम सावंत व माजी आमदार विलासराव जगताप यांचे आरोप-प्रत्यारोप म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून उद्घाटन झालेली कामे अर्धवट स्थितीमध्ये आहेत. त्याचे श्रेय कोणाला ?याची माहिती जनतेला द्यावी असे आवाहन युवा नेते विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
युवा नेते विक्रम ढोणे म्हणाले की, तालुक्यातील विकास कामांच्या उद्घाटनाच्या श्रेयवादावरून जतचे आमदार विक्रमसिंह सावंत आणि माजी आमदार विलासराव जगताप हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून ऐन गणेशोत्सवात तालुक्यातील जनतेची करमणूक करत आहेत, ती त्यांनी थांबवावी.नोव्हेंबर २०१७ मध्ये आमदार सावंत यांच्या हस्ते जत शहरातील चार रस्त्यांचे उद्घाटन झाले.याला पाच वर्षे कालावधी पूर्ण होऊनही रस्त्याची कामे अद्यापही अपूर्ण आहेत.तसेच माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्घाटन झाले.याला तीन वर्षे उलटूनही अद्याप हा रस्ता पूर्ण नाही याचे श्रेय कुणाला? कामे का पूर्ण झाली नाहीत. या कामावर निधी खर्च झाला आहे का ?याबाबत जनतेला खुलासा करण्याचे आवाहनही विक्रम ढोणे यांनी केले आहे.
ढोणे म्हणाले की, तालुक्यात अनेक प्रश्न असताना देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून फक्त टक्केवारी,आलिबाबा चाळीस चोर,साखर कारखाना,मनरेगा घोटाळा याच प्रश्नावर गेली अनेक वर्षे सातत्याने टीका टिप्पणी केली जात आहे. कारखाना आणि मनरेगा घोटाळ्यातील आरोप म्हणजे शिळ्या कढीला ऊत असा हा प्रकार आहे. कारण हे दोन्ही घोटाळे सर्वांच्याच सहभागाने झाले आहेत.यातून सामान्य जनतेची फक्त करमणूक होत असून हे जनतेच्या हिताचे नाही. व्यक्तिद्वेषी राजकारणामुळे तालुक्याचे यापूर्वीच अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे किमान यापुढे व्यक्तिद्वेषी राजकारण थांबवून विकासाचे रचनात्मक,धोरणात्मक दूरदृष्टीचे राजकारण करणे हेच तालुक्याचे हिताचे ठरेल.तालुक्यातील प्रशासनात अनेक अधिकारी, कर्मचारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे विकासकामांवर त्याचा परिणाम होत आहे.

जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिरनाळ तलावात माजी आमदार प्रकाश शेंडगेच्या काळात तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेद्रसिंह कुशवाह यांच्या प्रयत्नाने योजनेचे पाणी बिरनाळ तलावात आले. तेंव्हापासून जत शहराला पाणीपुरवठा नियमितपणे करणे अपेक्षित होते पण अजून शहराला उपलब्ध पाणी जनतेला नियमितपणे मिळत नाही. याचे श्रेय कुणाला असा सवाल विक्रम ढोणे यांनी उपस्थित केला.
