जत : जत तालुक्यातील विविध प्रश्नाची तातडीने सोडवणूक करावी,अशी मागणी जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.जत जि. सांगली हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा अवर्षणप्रवर्ग तालुका आहे. आजही ५० किमी वरून कांही गांवाना पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो तरी जवळपास २० ते २५ हजार लोक ऊस तोडणीसाठी पर जिल्ह्यात जातात.
विद्यार्थाना शिक्षणासाठी पारकट्टा, देऊळ किंवा समाजमंदिरात आसरा घ्यावा लागतो तर १ ली ते ७ वी पर्यंत १०० ते १५० विद्यार्थाना “१” च शिक्षक अध्यापन करतोय, आपण मोठ्या दिमाखात स्वांतत्र्याचा अमृतमोहत्सव साजरा करत असताना याला काय म्हणायच ? ७५ वर्षात मुलभुत सुविधा ही देऊ शकत नाही हे दुर्देव म्हणाव लागेल. आपण बुललेट ट्रेन, मेट्रो, मोनो, कोस्टोल रोड,समृध्दी महामार्ग साठी कोट्यावधी खर्च करत असताना ग्रामीण भागाच्या सर्वागीण विकासासाठी काहीही तरतुद नाही, सिंचनासाठी पाणी व सुधारित बी-बियाणे, खते व वीज मिळत नाही.जत तालुक्यातील जनतेच्या वतीने आपणास विनंती की येथील नागरीक टॅक्स भरत नाहीत काय? शासन या तालुक्याला सुविधा का देत नाही? प्रशासन योग्य काम करीत आहे का? जत तालुक्यातील जनता महाराष्ट्रात नाही काय? मग अन्याय का? असेही प्रश्न जमदाडे यांनी उपस्थित केले आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाळी अधिवेशनात जवळपास २३ हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मंजुर केल्या आहेत, त्या मध्ये जतला एक रूपयाही दिला नाही.१९९५ साली मंजुर झालेली मुळ म्हैशाळ योजना आज ही अपुर्ण आहे. ४८ पुर्णत व १७ अशत: वंचित गावासाठी विस्तारीत म्हैशाळ योजनेला मार्च २०१९ मध्ये लोकसभा प्रचारासाठी तत्वत: मान्याता दिलेली आहे. ही योजना पुर्ण करावी तसेच बेवनूर, नवाळवाडी व वाळेखिंडी या गावाना टेंभु योजनेतुन पाणी देण्यात यावे.जत शहराची नगरपरिषद होऊन १० वर्ष झाली, डी.पी. नाही, स्वतंत्र इमारत नाही, रस्ते, गटारीची सोय नाही मंजूर केलेले ७ कोटी स्थगिती दिले आहे.
८४५ पैकी २७६ जिल्हाच्या तुलनेत प्राथमिक शाळेत २५ टक्के शिक्षकाच्या जागा रिक्त आहेत. ४३६ खोल्यापैकी ६८ शाळेच्या खोल्या ना दुरुस्त आहेत.आरोग्य,पशु वैद्यकीय डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा वणवा आहे.तलाव, बंधारे चेक डेम इ. (जवळपास ९० कोटी )कामांना स्थगिती दिली आहे.२५१५ योजना, (४.०० कोटी ) मंजुर केलेल्या निधीला स्थगिती दिली आहे.शहराची ५० हजार लोकसंख्या असुन बिरनाळ तलावात मुबलक पाणी असुन ही ३-४ दिवसातुन पाणी येते ३५ वर्षापुर्वीच्या योजना आहे. नवीन योजना मंजुर करून २४ तास पाणी उपलब्ध करावे.
जत येथे पशुधन विभागाची ३५० एकर जागा असून कंठी व बिरनाळ हे साठवण तलाव लगतच आहेत. या ठिकाणी कृषी महाविद्यालय व पशु वैद्यकीय महाविद्यालय केलेस जत तालुक्याच्या विकासास चालना मिळणार आहे.पंचताराकिंत MIDC निर्माण केले तर हजारो युवक व सुरक्षित बेरोजगाराच्या हाताला काम मिळेल.संख किंवा उमदी येथे सर्व ट्रेड असल्याने आयटीआय कॉलेज मंजुर करावे.“माडग्याळ मेंढी” साठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करून मेंढपालकाना न्याय द्यावा,अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यात खमक्या नेता नसल्याने सातत्याने अन्याय होत आहे.त्यामुळे या सरकारने जत तालुक्यावरील हा अन्याय दूर करून विकासाला चालना द्यावी, अशी मागणी जमदाडे यांनी निवेदनात केली आहे.