तासगाव : तासगाव – मणेराजुरी या गावाला जोडणाऱ्या महामार्गावर वासुंबे फाट्यावरील धोकादायक वळण हटवण्याचा निर्णय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी आज घेतला. हे वळण हटवावे, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून वासुंबे ग्रामस्थांनी लढा उभारला होता. त्याला यश आले. या प्रकरणात आमदार सुमन पाटील, खासदार संजय पाटील यांनी लक्ष घालून हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यांची मध्यस्थी याठिकाणी कामी आली.
तासगाव – मणेराजुरी रस्त्यावर वासुंबे फाट्यावरील धोकादायक वळणावर आजपर्यंत अनेक अपघात घडले आहेत. या वळणामुळे वाहनचालकांना समोरून आलेले वाहन दिसत नव्हते. परिणामी अनेक अपघात होऊन 40 हुन अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. लोकांचा किड्या – मुंग्यांप्रमाणे जीव जात असताना सबंधित विभागाचे अधिकारी निर्धास्त होते. वाहनचालकांच्या जीवाचे मोलच त्यांना नव्हते. याठिकाणच्या अपघातात अनेक तरुण दगावले होते. त्यामुळे वासुंबे गावचे नागरिक गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक झाले होते. आमदार, खासदार यांच्यासह सबंधित विभागाच्या कानावर हा विषय वारंवार घातला होता. अनेक निवेदनेही देण्यात आली होती. सातत्याने पाठपुरावा करून हे धोकादायक वळण हटवावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सबंधित विभाग या मागणीला केराची टोपली दाखवत होता. त्यामुळे वासुंबेकर संतापले होते.
काल (बुधवारी) दुपारीही या फाट्यावर पुन्हा अपघात झाला. सतत अपघात होत असताना सबंधित विभाग झोपेचे सोंग घेत असल्याने वासुंबेकर नागरिकांनी बुधवारी अचानकपणे तासगाव – मणेराजुरी महामार्ग रोखून धरले. अचानक रास्ता रोको झाल्याने प्रशासन हडबडले. पोलीस निरिक्षक संजीव झाडे यांनी तात्काळ रास्ता रोकोच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पाठवले. शिवाय असा अचानक रास्ता रोको करून सर्वसामान्य लोकांना त्रास होईल. या विषयावर तोडगा काढण्यासाठी तातडीने सबंधित विभागाबरोबर बैठक घेऊ, असे आश्वासन झाडे यांनी दिले. त्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला.
दरम्यान, आज (गुरुवारी) खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील, सबंधित विभागाचे अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील व वासुंबे ग्रामस्थांमध्ये बैठक झाली. बैठकीत वासुंबे फाट्यावरील धोकादायक वळण हटवण्याचा निर्णय झाला. शिवाय याठिकाणी सरळ रस्ता करणे, त्यासाठी लागणारी जागा तातडीने हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत या वळणाच्या ठिकाणी रबरी स्पीड ब्रेकर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.