कवठेमहांकाळ : सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली,पृथ्वीतळावरील दुष्टप्रवृत्तीचा वध करणारी अशी ही आदिमाया जगदंबा म्हणजेच देशिंग गावची श्री अंबिका माता.येथील श्री अंबिका मातेचे स्थान हे स्वयंभू आहे.देवीची मूर्ती पाषाणमूर्ती असून तिची उंची साडे तीन फूट आहे.गाभाऱ्याला छोटेसे प्रवेशद्वार आहे.हळदी कुंकवाचा मान घेऊन समस्त भक्तगणावर कृपा करणाऱ्या श्री अंबिका देवीस प्रेमाने आई जगदंबा,आई भवानी,आई अंबाबाई अशा विविध नावांनी भक्त साद घालतात.
देशिंग- हरोली,मोरगाव,बनेवाडी,खरशिंग तसेच परिसरातील इतर गावचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.अंबिका मातेची यात्रा तसेच नवरात्र उत्सव गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे मोठ्या उत्साहात साजरा करता आला नव्हता परंतु यावेळी कोणतेही निर्बंध नसल्याने मातेचा नवरात्रोत्सव आणि यात्रा विविध कार्यक्रमासह मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.गोंधळ,भारुड,कीर्तन,एकतारी भजन,ओव्या तसेच खेळ पैठणीचा असे नऊ दिवस लोककलांना चालना देण्याबरोबरच समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य या काळात असे कार्यक्रम आयोजित करून करण्यात येते आहे.
दिनांक ४ ऑक्टोबर रोजी देवीच्या यात्रेचा प्रमुख दिवस असून याच दिवशी पालखी सोहळा आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.बुधवारी दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता शिलंगणाचा कार्यक्रम शिलंगण माळ,देशिंग येथे होऊन या नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.