विद्यापीठ आंतर विभागीय स्पर्धा | सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूसाठी जतेत ४९८ स्पर्धाचे आयोजन

0
2
राजे रामराव महाविद्यालयाची मैदानी स्पर्धेतील परंपरा गौरवशाली
– अभयकुमार साळुंखे
जत,संकेत टाइम्स : जत येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, संचलित राजे रामराव महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतर विभागीय मैदानी स्पर्धेचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे,श्रीमंत शार्दुलराजे डफळे, बाबासाहेब कोडग,चंद्रशेखर गोब्बी, परशुराम मोरे उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जितेंद्र वनकोटी,उपप्राचार्य सिद्राम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

 

प्राचार्य डॉ.सुरेश पाटील म्हणाले, “जत सारख्या दुर्गम भागात हे महाविद्यालय असतानादेखील या महाविद्यालयाचा मैदानी खेळातील नावलौकिक देशभर आहे. या मातीत अनेक खेळाडू घडले आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व खेळाडूंना प्रेरणा मिळण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची, पंचांची, संघ व्यवस्थापकांची व्यवस्था महाविद्यालयाने केलेली आहे.”
आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, “खेळामध्ये हार-जीत होत असते. खेळाडूंनी स्पर्धेत होणार पराभव पचवून पुन्हा नव्या उमेदीने ध्येयाचा पाठलाग करावा व खेळ भावना वृध्दिंगत करावी. माजी विद्यार्थी म्हणून महाविद्यालयाच्या भौतिक विकासासाठी नक्कीच मदत केली जाईल.”

 

प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, “मैदानी स्पर्धेतील जत महाविद्यालयाची परंपरा अतिशय गौरवशाली अशी आहे. प्राध्यापकांना विशिष्ट भौगोलिक प्रदेशात असणाऱ्या समाजाच्या वैशिष्ट्यांची माहिती असायला हवी. यामधून त्यांच्यामध्ये असणारी विशिष्ट अशी कौशल्ये हेरता येतात आणि त्यानुसार विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कौशल्यांना चालना देता येते. हेच काम राजे रामराव महाविद्यालयातील यापूर्वीच्या प्राचार्यांनी व प्राध्यापकांनी केलेले आहे. त्यामुळेच या क्षेत्रातील या महाविद्यालयाचा नावलौकिक आहे.”
शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय स्पर्धेमध्ये सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातून ४९८ हून अधिक विविध खेळ प्रकारातील खेळाडू सहभागी होणार आहेत. सदर मैदानी स्पर्धेमध्ये लघु, मध्यम व लांब पल्ल्याचे धावणे, उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, बांबु उडी, गोळा, थाळी, भाला, हातोडा फेक, अडथळा शर्यत इ. खेळ प्रकार खेळले जाणार आहेत. ही स्पर्धा पुढील ३ दिवस चालणार आहे.सूत्रसंचालन प्रा.सिद्राम चव्हाण यांनी तर आभार प्रा.अनुप मुळे यांनी मानले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here