सांगली : भारत जोडो यात्रेत चालण्याचा व लोकांशी संवाद साधत असताना आयुष्यातल्या एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा अनुभव रोमहर्षक होता,असे मत कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी व्यक्त केले.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी पांठिबा देत यात्रेत सामील झाले.यात पाटीलसह,माजी मंत्री विश्वजीत कदम,आ.विक्रमसिंह सांवतसह जिल्ह्यातील पदाधिकारी सामील झाले होते.यावेळी राहुल गांधीजी यांना सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देशाचा अन्नदाता शेतकरीराजा व त्याच्या ओळखीचं, कृषिसंस्कृतीच प्रतीक बैलगाडीत बसलेल्या शेतकरी कुटुंबाची प्रतिकृती भेट देण्यात आली.
पाटील म्हणाले, यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद अविश्वसनीय असाच आहे. ज्याप्रकारे राहुल गांधीजींना भेटण्यासाठी, आपल्या मनातील भावना त्यांच्याजवळ व्यक्त करण्यासाठी अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत लोकांचा महासागर लोटलाय. यामागे लोकांचे प्रेम आहे, काँग्रेस पक्षावर विश्वास आहे, युवकांना भविष्याची आस आहे. वाढत्या संप्रदायिकतेमुळे लोकं दडपणाखाली आहेत आणि भारत जोडो यात्रा त्यांना आधार वाटत आहे. एक बदलाची, देशात बऱ्याच काळानंतर काहीतरी सकारात्मक घडत आहे अशी लोकांची भावना या यात्रेबद्दल पाहायला मिळत आहे. २०१४ पासून टिव्ही डिबेट्समधून दाखवला गेलेला भारत आणि खरा भारत वेगळा आहे हे भारत जोडो यात्रेतून पाहायला मिळत आहे. समता, बंधुता जपत, सर्व भारतीयांना सोबत घेत समृद्ध भारताच्या निर्मितीच स्वप्न घेऊन निघालेली ही यात्रा नक्कीच इतिहास घडवेल यात शंका नाही,असेही विशाल पाटील म्हणाले.