जत : ग्रामपंचायत निवडणूक निमित्त युवकांची राजकारणात भरती होत आहे, जुन्यांना आराम देण्याचा त्यांचा बेत आहे. मात्र, राजकीय प्रवेशाने युवापिढीचे भवितव्य धोक्यात येणार असून शिक्षण, नोकरी, व्यवसाय यापासून त्यांनाही आराम देण्याचा बेत असल्याने कार्यकर्ता हीच त्यांची पदवी होणार आहे.
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत.जत तालुक्यातील ८१ गावातील निवडणुका होत आहेत. त्यात शासनाने पुन्हा जनतेतून सरपंच निवडण्याचा मान दिल्याने राजकीय गमंत वाढली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक ठिकाणी राजकीय पक्ष गुंडाळून ठेवले जातात. फक्त जिरवाजिरवी हाच उद्देश येथे ठेवला जातो. निवडणूक आली की अनेकांच्या अंगात राजकारणाचे वारे संचारते, पुन्हा एकदा गटतट निर्माण होतात. गावात एकमेकांविषयी द्वेषाची भावना तयार होते. जिगरी दोस्त दुरावतात एवढेच नव्हे तर नातेसंबंध विसरले जातात हा राजकीय इतिहास आहे.
अलीकडच्या काळात युवकांना राजकारणात प्राधान्य दिले आहे. त्यांचा राजकीय प्रवेश खर्या अर्थाने संघटना आणि ग्रामपंचायत निवडणूक यातून केला जात आहे. काही युवक सरपंच तर काही सदस्यही झाले आहेत. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचाच ओढा जास्त आहे. कारण जुन्यांना आराम देण्याचा बेत आहे. सध्याचे राजकारण युवा पिढीवर येऊन टेकले आहे. पूर्वी मुलगा बापाचा मान ठेवीत होता. आता बापाला मुलाचा मान ठेवावा लागतो. हा बदल ज्येष्ठ राजकीयांनी आत्मसात केला आणि हाच धागा पकडून राजकारणाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न चालू झाला आहे.युवा पिढी देशाचा आधारस्तंभ आहे असा नारा पुढे करून आगामी होणार्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राजकारणाचा आधारस्तंभ म्हणून त्यांचा कसा वापर करता येईल याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. गाव, तालुका, जिल्हा, राज्य अशा ठिकाणी त्यांचे मेळावे घेऊन लालुच दाखविली जात आहे.
परिणामी हाच युवक भाया वर करून ग्रामपंचायत निवडणुकीत सरसावत आहे. याचा प्रत्यय झालेल्या व होऊ घातलेल्या निवडणुकीत पहावयास मिळत असून, यापुढे मात्र पूर्वजांनी हात टेकले आहेत.युवकांची वैचारीक क्षमता कमी असते तर भावनेच्या भरात निर्णय सेकंदात असतात, पंरतु दुरोगामी परिणाम बरबादीचे असतात. याचा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही. त्यामुळे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शेती हा मूळ उद्देश बाजूला जाऊन राजकारणाचे विषारी बीज त्यांच्या मनात रुजवले जात आहे. सध्या याची प्रचिती येत असून, राजकारणात गुरफटलेले काही युवक दोन वर्षांपासून एकाच वर्गात आहेत, नोकरीपासून वंचित आहेत. व्यवसाय तोटयात आहे तर शेतीचा आळस झाला आहे. एवढ्यावर राजकारण थांबले नाही तर नेत्यापुढे मोठेपणासाठी काही युवकांवर गुन्हे दाखल होऊन त्यांचे भविष्य बरबाद झाल्याच्या घटनाही ताज्या आहेत.
युवक हे खरे देशाच्या सुरक्षिततेचे आधारस्तंभ आहेत. महासत्तेसाठी त्यांचे योगदान महत्वाचे आहे. नवीन तंत्रज्ञानात त्यांच्या ज्ञानाची आवश्यकता आहे. धार्मिकता, सुसंस्कार, आदर यातून सामाजकारण व विकासकारण क्षेत्रात त्यांच्या कार्याची गरज असताना मतलबासाठी या युवा पिढीला राजकारणात गोवण्याचा होत असलेला प्रयत्न देशहिताच्या दृष्टीने घातक असून, त्यांच्या भविष्याला मारक आहे. भावनेचा विरह बाजूला सावरून याचा विचार युवकांनी केल्यास देशाचे व त्यांचे भविष्य उज्वल होणार आहे अन्यथा भाषण हे शिक्षण, कार्यकर्ता ही बिनपगारी नोकरी, खाद्यांवर पक्षाचा झेंडा ही निकामी चाकरी खर्चाला पदरमोड हा व्यवसाय आणि वेड्याबाभळी ही शेती होऊन काँग्रेस गवतात त्याला भाजत सेनाने हात भरावे लागून पश्चतापाची वेळ येणार आहे.जत तालुक्यातील होत असलेल्या ८१ गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांचा सहभाग मोठया प्रमाणात दिसून येत आहे. उमेदवारी साठी त्यांची इच्छा प्रदर्शित आहे. जुने जानते त्यांच्याच गळ्यात घंटा बांधण्याच्या विचारात आहेत. युवकांत गटतट पडले आहेत. राजकारणापायी वादविवाद चालू आहेत हीच खरी राजकीय शिकवण यातून दिसून येत आहे.