जत : थंडीच्या प्रमाणात गुरुवारपासून चांगलीच वाढ झाली असून पारा दिवसेन् दिवस उतरत आहे. त्यामुळे जतकरांना थंडीची चांगलीच हुडहुडी भरली आहे. गरम कपड्यांना मोठय़ा प्रमाणावर मागणी वाढली आहे. रात्री लवकरच रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे दिसत आहे. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद गेल्या काही दिवसात झाली आहे.
ऋतुमानानुसार ऑक्टोबर महिन्यापासून थंडीला सुरुवात होत असते. पण नोव्हेंबर महिन्याच्या पंधरवड्यानंतर थंडी जाणवण्यास सुरुवात होते. दरवर्षाप्रमाणे यंदाही तसेच घडले. नोंव्हेबर महिना उजाडला. सुरुवातीचे आठ ते दहा दिवस उन्हाचे चटके नागरिकांनी सहन केले. नंतरच्या काळात अचानक थंडीने जोर धरला. दुपारी उन्हाच्या झळा आणि रात्री थंडी अशी काहीशी स्थिती निर्माण झाली होती. पण कालांतराने यात फरक पडला. नोंव्हेबर महिन्याच्या १५ तारखेनंतर थंडीच्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली.
गेल्या दोन दिवसांपासून यात सातत्याने वाढ होत असल्याचे जाणवत आहे.थंडीत वाढ झाल्याने जिल्हा गारठला आहे. नागरिक दिवसभर गरम कपडे घालूनच फिरताना दिसत आहे.वाहतूक झाली कमी थंडीत वाढ झाल्याने नागरिक रात्री घराबाहेर निघण्याचे टाळत आहेत. त्यामुळे रात्री ९ वाजेनंतर गावातील कॉलनी परिसरातील रस्ते निर्मनुष्य होत आहे.बुधवार आणि गुरूवारी तर दिवसभर गार वारे वाहत होते.
थंडीचे दिवस असल्याने मॉर्निंग वॉक करणार्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पहाटेपासूनच फिरणारे अधिक प्रमाणात दिसतात. मागील आठवड्याच्या तुलनेत ही संख्या वाढतीच आहे.तिबेटी स्वेटर विक्रेत्यांकडे स्वेटर, मफलर विकत घेणार्यांची संख्या वाढली आहे. दत्त जयंती, ईद, ख्रिसमस आणि नववर्षाचे स्वागत या उत्सवाच्या काळात थंडीचे आगमन झाल्याने वाढणारी थंडी आनंद द्विगुणित करणारी ठरत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर जाणवण्यास सुरुवात झाली आहे. शासकीय दवाखान्यांसह खासगी दवाखाने रुग्णांनी भरली आहेत. सद्य:स्थितीत रुग्णांची संख्या नेहमीपेक्षा अधिक असल्याचे चित्र ठिकठिकाणच्या दवाखान्यांमधून समोर आले आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखीने त्रस्त असलेल्यांचे आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जात आहेत.