जत,संकेत टाइम्स : दुष्काळी जत तालुक्याला पाणी द्या या एकमेव मागणीसाठी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना व श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समिती व जतकरच्या वतीने शिष्टमंडळ थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याशिवाय, जतकरांच्या व्यथा त्यांच्या दरबारात मांडल्याशिवाय जतला परत न येण्याचा निर्धार करत तुकाराम बाबा महाराज यांनी मंगळवारी आठ गावातील तलावात एकत्र केलेले पाणी तसेच सांगलीतील कृष्णेचे पाणी एका कलशात घेवून जत- सांगली मार्गे मुंबई वारी सुरू केली आहे.
मंगळवारी सकाळी तुकाराम बाबा महाराज यांनी तालुक्यातील कोळगिरी, व्हसपेठ, गुडडापूर, संख, सोर्डी, सिद्धनाथ, मोटेवाडी व भिवर्गी या आठ तलावातील पाणी कलशात एकत्र केले. या पाण्यासह तुकाराम बाबा महाराज व शिष्टमंडळाने जत तहसिल कार्यालय गाठले.तालुका प्रशासनाला निवेदन देत जतकरांच्या व्यथा मांडल्या. यावेळी प्रशांत कांबळे, सुरज मणेर, बसवराज व्हनखंडे, जयदीप मोरे,श्रीशैल कुंभार, अशपाक बारुदवाले,संतोष पोरे, बाळासाहेब मोठे, रामचंद्र रणशिंगे आदी उपस्थित होते.
मायथळ मुख्य कालव्यातून म्हैसाळचे पाणी कोळगिरी, व्हसपेठ, गुडडापूर, संख, सोर्डी, सिद्धनाथ, मोटेवाडी व भिवर्गी या आठ तलावात सायफन पद्धतीने पाणी जावू शकते. या आठ तलावातील पाणी एका कलशमध्ये एकत्र करण्यात आले आहे. जतहुन सांगली व तेथे जिल्हाधिकारी कार्यालयापासून पायी कृष्णा नदीवर जात तेथील कृष्णेचे पाणी त्या आठ तलावाच्या पाण्यात मिसळून ते पाणी घेवून आपण मंत्रालय गाठून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी जत येथे बोलताना सांगितले.
जत येथून तुकाराम बाबासह शिष्टमंडळाने सांगली गाठली. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी शिष्टमंडळाला अडविले. एक तासभर हा प्रकार सुरू होता. जिल्हाधिकारी कार्यालयापासून कलशासह कृष्णाकाठ पायी जात कृष्णेचे पाणी त्या आठ तलावातून आणलेल्या पाण्यामध्ये मिसळण्यात आले त्यानंतर कलश मुंबईकडे रवाना झाला.
तुकाराम बाबा यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मुंबईकडे प्रस्थान केले.