जत,संकेत टाइम्स : कर्नाटक राज्याकडे पाणी मागण्याची व ते पाणी जतला देण्याची मागणी राज्य सरकारला आ. विक्रमसिंह सावंत यांनी नागपूर अधिवेशनामध्ये केली आहे. आ.सावंत यांनीच महाराष्ट्र सरकारने २०१५ ते २०१९ पर्यंत ६ टी. एम. सी पाणी कर्नाटकला दिल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्राने ६ टी. एम. सी पाणी ऐन उन्हाळ्यात मानवतेच्या भूमिकेतून कर्नाटकला विनामूल्य दिले आहे. याचाच अर्थ कर्नाटक राज्याकडे तुबची बबलेश्वर योजने मध्ये शिल्लक पाणी नाही. तसे कर्नाटक सरकारने महाराष्ट्र शासनाला लेखी कळविले आहे,अशी वस्तूस्थिती असताना आ.सावंत हे जतच्या जनतेची दिशाभूल वारंवार करतात व विधान सभेचा वेळीही वाया घालवतात व आपलेही हसे करून घेत आहेत. ते त्यांनी थांबवावे,असे आवाहन युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जगताप,तालुकाध्यक्ष प्रमोद सांवत सह भाजपा नेत्यांनी केले आहे.त्यांनी तसे प्रसिध्दीपत्रक पत्रकारांना दिले आहे.
त्यात म्हटले आहे, योजनेला त्याऐवजी आपल्या हक्काची म्हैसाळ विस्तारित योजनेला शासनाने मान्यता दिलेली आहे. आपल्या हक्काच्या योजनेचा पाठपुरावा करून दोन वर्षामध्ये योजना कशी पूर्ण करता येईल हे न पाहता काल्पनिक अशा तुबची बबलेश्वर योजनेचे गाजर दाखवून, पावसाच्या पाण्याचे पूजन करून आ.सावंत लोकांना फसवत आहेत. दोन्ही राज्याकडे तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी देण्याचा प्रस्ताव नाही. कर्नाटककडे पाणी उपलब्ध नाही अशी वस्तूस्थिती असताना आ.विक्रम सावंत हे तुबची बबलेश्वर योजनेचेचं तुणतुणे वाजवीत आहेत हे हास्यास्पद तर आहेच त्यामुळे आ. सावंत यांनी विधान सभेमध्ये योग्य भूमिका मांडताना शहाण्याचा सल्ला घ्यावा असेही जगताप,सावंत व भाजपा नेत्यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.यावेळी अण्णाप्पा भिसे, सुनील पवार, सद्दाम आत्तार, उमेश सावंत आदी भाजप नेते उपस्थित होते.