मार्गाची दुरवस्था
येळवी – अत्यंत वर्दळीच्या मार्गासह परिसरातील अनेक गावाना जोडणाऱ्या रस्त्याची पुरती वाट लागली असून या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पंचायत समितीच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. तसेच रस्त्याच्या कडेला काटेरी झुडूपेही वाढले आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक वाहना अडचणीचे ठरत आहे.
स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष
जत – तालुक्यातील विविध गावांमध्ये अस्वच्छतेचा कळस झाला आहे. ठिकठिकाणी असलेले उकीरडे, सांडपाण्याची गटारं यामुळे नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. शिवाय शौचास रस्त्याच्या कडेला बसण्याचे प्रमाण नियंत्रणाबाहेर आहे. मात्र मोठ्या गाजावाज्यात सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष आहे. यामुळे शहरासह अनेक गावात साथीचे आजार पसरण्याची भीती आहे.
संख ग्रामस्थ विविध समस्यांमुळे त्रस्त
संख – परिसरातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्या संख येथील नागरिक सध्या विविध समस्यांनी त्रस्त आहे. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे.
प्रवासी निवार्याची दयनीय अवस्था
डफळापूर – अतिक्रमणाचा विळखा, कालबाह्य झालेली पत्रे भेगा पडलेल्या भिंती ,आणि जाणून बुजून काढलेल्या खिडक्या ,बसण्याची जागेवर पडलेले खड्डे आदी समस्यांनी डफळापूर सह तालुक्यातील प्रवासी निवार्यांना ग्रासले आहे. याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. ऊन्ह, पाऊस झेलत जनतेला प्रवासासाठी वाहनाची प्रतीक्षा करत थांबावे लागते. या समस्येकडे मात्र संबधित प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात रस्त्यावर उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
बोगस डॉक्टरांकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
भिवर्गी : शासकीय आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचा फायदा गावागावात सक्रिय झालेले बोगस डॉक्टर घेत असून यामुळे ग्रामीण जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. तालुका आरोग्य विभागाला या बोगस डॉक्टरांवर कारवाईचे अधिकार असताना त्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी हे बोगस डॉक्टर गावातील रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत.अशा डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
उघड्या डीपी देताहेत अपघाताला आमंत्रण
बिंळूर – वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावागावातील डीपी अपघातास आमंत्रण देत आहे. प्रत्येक गावातील डीपी सताड उघड्या असून फ्यूज तारांऐवजी थेट तारा जोडून विज पुरवठा सुरू आहे.जत तालुक्यातील बिंळूर, डफळापूर परिसरात या पेक्षाही स्थिती भीषण आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. अनेक डीपी अगदी गावाजवळ आणि काही तर शालेय परिसरालगत डीपी असल्याने धोकादायक ठरत आहेत. परवाच सांगलात आलेल्या उर्जामंत्रानी अशा डिपी तातडीने बदलावेत असे आदेश देऊनही अद्याप डिपी बदलण्याबाबत हालचाली नाहीत.